सांगवी : सांगवी व परिसरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी बेवारस वाहने सोडून अथवा टाकून दिलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. या शहराचे व परिसराचे विद्रूपीकरण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.सांगवीत रस्त्याच्या कडेने आणि अडगळीच्या ठिकाणी वाहने बेवारस दिसून येतात. ही बेवारस वाहने पोलीस प्रशासनास दिसत का नाहीत, हा एक मोठा प्रश्न असून, सांगवीतील साई चौक, जुनी सांगवीतील अहल्याबाई होळकर घाट, काटेपुरम चौक, फेमस चौक, मुळा नदी रस्ता आदी परिसरात वाहने बेवारस दिसून येतात. नागरिक जुनी व वापरात नसलेली वाहने रस्त्याच्या कडेला दुतर्फा लावून अथवा सोडून देतात. भंगार स्वरूपातील ही वाहने वर्षानुवर्षे तशीच पडून असल्याने प्रदूषण होत आहे. काही ठिकाणी या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच परिसर विद्रूपीकरणात भर पडत आहे.अनेक ठिकाणी काही वाहनांना रस्त्याला बेवारस फेकून नागरिक निघून जातात. ही टाकून दिलेली वाहने कोणाची आहेत व चोरीची तर नाहीत ना, याबाबत तपास होणे आवश्यक आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून अशा बेवारस वाहनांच्या मालकांची माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे संबंधित वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन वाहनांची विल्हेवाट लावण्यास मदत होईल. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.बंद अवस्थेतील ट्रक ठरत आहे वाहतुकीस अडथळारावेत : येथील भोंडवे कॉर्नर या मुख्य चौकात मागील आठ ते दहा दिवसांपासून एक बेवारस ट्रक उभा असल्याने येथे सकाळ-संध्याकाळ वाहतुकीस अडथळा ठरत आहे. रावेत-आकुर्डी स्टेशन मार्गावर थांबणारी अवजड वाहने, तसेच नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. रस्त्याच्या कडेला अनेक दिवसांपासून उभा असलेला ट्रक वेळेवर बाजूला न केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातासही कारणीभूत ठरत आहे.रस्त्याकडेच्या बंद वाहनांमुळे इतर वाहनांसाठी रस्ता अरुंद होत आहे. इतर वाहनांचा अंदाज येत नाही. अंदाज येत नसल्याने वाहनचालकांना अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषत: या वाहनांमुळे दुचाकीस्वारांसाठी मोठी अडचण निर्माण होत असून, अपघात होत आहेत. याकडे वाहतूक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. भर चौकात बेवारस थांबलेल्या वाहनांवर दुसरे एखादे वाहन धडकून एखादा अपघात झाल्यावर हा ट्रक बाजूला काढणार का, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.जॅमर लावूनही उपयोग नाहीगेल्या आठ-दहा दिवसांपासून बेवारस अवस्थेत भोंडवे कॉर्नर चौकात असलेल्या ट्रकच्या पुढील दोन्ही चाकांना वाहतूक विभागाने जॅमर लावले आहेत. परंतु आजपर्यंत या ट्रकचा मालक अथवा दुसरा कोणी फिरकलेला नाही. त्यामुळे जॅमर लावूनही उपयोग झाला नसल्याचे दिसून येते. येथे एकीकडे महावितरणाचा मोठा टॉवर तर दुसरीकडे बंद पडलेला ट्रक त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. यामधून वाहन चालविताना वाहनचालकांची दमछाक होत आहे.
बेवारस वाहनांमुळे सुरक्षा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 03:21 IST