लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी (जि. पुणे) : हिंजवडी आयटी पार्कमधील बस जळीत कांडप्रकरणी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली. बसचालकाला बेंझिन केमिकल कसे मिळाले, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आसन बसविण्यात आले होते का, असे प्रश्न पोलिसांकडून विचारत चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बसचा चालक जनार्दन हंबर्डीकर याचे बसमधील काही कर्मचाऱ्यांशी कंपनीत वाद होत असत. तसेच दिवाळीत कंपनीने त्याला पगारवाढही दिली नव्हती. त्याचा राग हंबर्डीकरच्या डोक्यात होता. त्याने व्योमा ग्राफिक्स कंपनीतूनच बेंझिन सोल्युशन केमिकल प्लास्टिकच्या बाटलीत भरून गाडीत चालकाच्या आसनाखाली आणून ठेवले आणि भयंकर हत्याकांड घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. कंपनीचे मालक नितीन शाह यांनी या घटनेबाबत माध्यमांशी संवाद साधला.
या घटनेचा आम्हाला प्रचंड धक्का बसला आहे. या धक्क्यातून आम्ही अद्याप बाहेर आलेलो नाही. आम्ही जखमींनादेखील योग्य मदत करत आहोत. यातील काही कामगार आमच्याकडे १९८५ पासून तर काही कामगार २००६ सालापासून काम करीत आहेत. कंपनीने बसचालकाचा पूर्ण पगार दिला आहे. कधीही त्याचा पगार थकवलेला नाही, असा दावाही शाह यांनी केला.
‘हे’ प्रश्न विचारले?
- सामान्यांना न भेटणारे घातक बेंझिन केमिकल कंपनीतून चोरीला कसे गेले? यात कंपनीचा निष्काळजीपणा कसा झाला? टेम्पो ट्रॅव्हलर बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सीट बसविण्यात आले होते का? बसचालक हंबर्डीकर याला बोनस किती दिला होता?
- पगार थकवला होता का? बसचालकाने काही तक्रारी केल्या का? त्याच्याबाबत इतर कामगारांनी तक्रारी केल्या होत्या का? तक्रारींची वेळीच दखल का घेतली नाही, असे प्रश्न विचारत पोलिसांनी नितीश शाह यांच्याकडे चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे.