- सचिन ठाकरपवनानगर : पवनमावळ परिसरात सध्या सुरू असलेला डंपरमाफियांचा बेकायदेशीर कारभार भयावह टप्प्यावर पोहोचला असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर माती आणि मुरमाची चोरी केली जात आहे. नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा दुप्पट भरलेले डंपर बेफाम वेगाने रस्त्यांवरून धावत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला आहे.
रस्त्यांवर ठिकठिकाणी सांडणारी माती आणि मुरुम यामुळे वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण बिघडत असून, अपघातांची मालिका सुरू आहे. दुचाकीस्वार, शेतकरी, स्थानिक ग्रामस्थांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी भीषण अपघात घडले आहेत.
या बेकायदेशीर व्यवसायांमागे काही प्रभावशाली लोकांचे छुपे पाठबळ असल्याची चर्चा आहे. कारवाई होते, पण ती अर्धवटच थांबते आणि लोकप्रतिनिधींच्या नावावर प्रकरण दाबले जाते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
पोलिसांनी या सर्व प्रकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कायद्याची पायमल्ली सहन केली जाणार नाही. अवैध माती-मुरुम वाहतूक करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. कोणत्याही दबावाला बळी न पडता थेट गुन्हे दाखल करून वाहन जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. यासाठी विशेष मोहीम आखण्यात आली असून, रात्री कडक नाकाबंदी, गस्त, संशयित डंपरवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. महसूल विभागाच्या समन्वयाने संयुक्त कारवाई करण्याची तयारी केली आहे.
डंपरमाफियांचा काळा खेळ थांबवण्यासाठी आता निर्णायक लढाई सुरू झाली आहे. यापुढे कोणाच्याही शिफारशी किंवा दबावाखाली कारवाई थांबवली जाणार नाही. दोषींना थेट तुरुंगात पाठवले जाईल. नागरिकांनीही या विरोधात आवाज उठवत पोलिसांना साथ देण्याची गरज आहे. अवैध डंपर, संशयास्पद हालचाली किंवा रात्री चालणाऱ्या माती चोरीबाबत त्वरित माहिती द्यावी. -दिनेश तायडे, पोलिस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण
रात्रीच्या वेळी पवनानगर चौकातून मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करणारे डंपर वेगाने जात असतात. पवनानगर चौकात व परिसरात जेथे आवश्यक आहे, तेथे गतिरोधक न बसवल्यास येत्या १५ दिवसांत वडगाव मावळला जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागास टाळे ठोकणार आहे. -सुरेश गुप्ता, उद्धवसेना
रात्रीच्या वेळी डंपर इतक्या वेगाने धावतात की, घराबाहेर पडायलाही भीती वाटते. रस्त्यावर पडणाऱ्या मातीमुळे अनेक वेळा घसरून अपघात झाले आहेत. प्रशासनाने आता खरोखर कडक कारवाई करावी. - सुरेश पोटे, स्थानिक नागरिक
Web Summary : Dumper mafia terrorizes Pavan Maval, stealing soil at night. Overloaded dumpers cause accidents. Locals fear for their safety. Police promise strict action, patrols, and vehicle seizures. Citizens are urged to report illegal activity.
Web Summary : पवन मावल में डंपर माफिया का आतंक, रात में मिट्टी की चोरी। ओवरलोड डंपर दुर्घटनाओं का कारण बनते हैं। स्थानीय लोग अपनी सुरक्षा को लेकर चिंतित हैं। पुलिस ने सख्त कार्रवाई, गश्त और वाहन जब्ती का वादा किया है। नागरिकों से अवैध गतिविधि की रिपोर्ट करने का आग्रह किया गया है।