पिंपरी : कामशेत येथील खडकाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मनसेचे शहराध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. राजकीय, तसेच पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची चर्चा कामशेतमध्ये आहे. स्वर्गीय दिलीप टाटिया पॅनल आणि परिवर्तन पॅनल या निवडणुकीत लढत देत होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, आणि मनसे यांचे टाटिया पॅनल, तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष यांचे परिवर्तन पॅनल अशा दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत होणार होती. गेल्या २५ वर्षांपासून टाटिया पॅनलची या ग्रामपंचायतीत सत्ता होती. गतवर्षी दोन जागा गमावल्याने त्यांची सत्ता गेली होती. या वेळी पुन्हा सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने विविध पक्षांना पॅनलमध्ये घेतले होते. या पॅनलमध्ये मनसेचाही सहभाग असल्याने मनसेचे मावळ तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज प्रचारात सक्रिय होते. ते सकाळी ९ वाजल्यापासूनच विविध मतदान केंद्रांवर फेरफटका मारत होते. दुपारी शिवाजी चौकात आले, त्या वेळी रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्यात ते मृत्युमुखी पडले.२०१४ मध्ये बंटी वाळुंज यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी मनसेच्या तालुकाध्यक्षपदाचा भार स्वीकारला होता. राजकीय वर्चस्व वाढू लागल्याने त्यांचे वैमनस्य वाढले होते. हे एक कारण आणि २००७ पासूनचे त्यांचे काहींशी असलेले वैयक्तिक वैमनस्य हे दुसरे एक कारण चर्चेत पुढे येत आहे. पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. आरोपी हाती लागल्यानंतर खुनामागील कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
राजकीय, पूर्ववैमनस्यातून खून?
By admin | Updated: August 5, 2015 03:24 IST