पिंपरी : वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी रजिस्टर्ड प्लेट’ (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे वाहनधारक प्लेटसाठी ऑनलाइन नोंदणी करतात. ही बाब हेरून सायबर गुन्हेगारांकडून बनावट वेबसाइटवरून वाहनधारकांची फसवणूक करण्याचा नवा फंडा अवलंबला जात आहे. त्यामुळे ‘एचएसआरपी’ नोंदणी करताना वाहनधारकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) नोंदणीसाठी शासनाने https://transport.maharashtra.gov.inही अधिकृत वेबसाइट उपलब्ध केली आहे. मात्र, सायबर गुन्हेगार या वेबसाइटशी साधर्म्य असलेली वेबसाइट तयार करून फसवणूक करतात. या वेबसाइटची लिंक सोशल मीडियावर शेअर करतात. ‘लिंकवर क्लिक करा आणि घरबसल्या मिळवा एचएसआरपी नंबरप्लेट’, असे आमिष दाखवणारे मेसेज आणि बनावट वेबसाइटची लिंक व्हाटस्ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि विविध वेबसाइटवर दिली जाते.
सायबर गुन्हेगार हे सातत्याने नवे फंडे वापरतात. नागरिकांनी बनावट लिंक, वेबसाइट ओळखली पाहिजे. गुगलवर सर्च केल्यानंतर संबंधित माहिती, लिंक, वेबसाइट याबाबत खातरजमा करावी. ‘एचएसआरपी’ नोंदणीसाठी सायबर गुन्हेगार विविध लिंक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यावर क्लिक करू नये. - राेहित कांबळे, सायबर सुरक्षा तज्ज्ञ, चिखलीनागरिकांनी संशयित लिंकवर क्लिक करू नये, अनधिकृत वेबसाइटवर माहिती देऊ नये. सायबर फसवणूक झाल्यास १९३० या नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइनवर कॉल करावा. राष्ट्रीय सायबर क्राइम नोंदणी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवावी. सायबर पोलिस किंवा स्थानिक पोलिस ठाण्याशीही संपर्क साधता येऊ शकतो. आपल्या बँकेला त्वरित माहिती द्यावी व एटीएम, डेबिट कार्ड ब्लॉक करावे. - रविकिरण नाळे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पिंपरी-चिंचवड