पिंपरी : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे देवदर्शनासाठी भक्त निवासात रूम बुक करण्याच्या बहाण्याने सात लाख २२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. देहूरोड येथे २७ ते २९ एप्रिल दरम्यान ही घटना घडली.
राहूल अशोकराव पाठक (४१, रा. देहूरोड) यांनी शुक्रवारी (दि. १६ मे) याबाबत देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सतीश शर्मा याच्यासह दोन मोबाइल धारकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाठक यांनी कुटुंबासह बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे देवदर्शनासाठी जाण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने एका वेबासाइटवर शोध घेतला. त्यानंतर संशयितांनी दिलेल्या दोन मोबाइल क्रमांकावर फिर्यादी पाठक यांनी संपर्क साधला. त्यानंतर सतीश शर्मा नावाच्या संशयिताने शेगाव येथे भक्त निवासमधील एसी रूम बुकिंगच्या नावाखाली फिर्यादी पाठक यांच्याकडून विविध युपीआय कोडद्वारे सात लाख २२ हजार रुपये घेतले. ही रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. पोलिस निरीक्षक विजयकुमार वाकसे तपास करीत आहेत.