पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोरच दोन तरुणांवर कोयत्याने वार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास घडली. अॅन्थोनी फ्रान्सिस (वय २२) आणि रॉबिन फ्रान्सिस (वय २५, दोघेही रा. पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमोल बसवराज वाल्हे (वय २०, रा. सेक्टर क्रमांक २२, इंदिरानगर, स्वामी विवेकानंद शाळेजवळ, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी मध्यरात्री अमोल वाल्हे व त्यांचे मित्र अप्पासाहेब अतुल कदम (वय २०, रा. निगडी) हे एमएच १४ एफआर ५५५० या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते. त्या वेळी आरोपींनी त्यांची दुचाकी वाल्हे यांच्या दुचाकीला आडवी लावली. तसेच वाल्हे व त्यांच्या मित्रावर कोयत्याने वार केले. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, अधिक तपास सुरू आहे.
पोलीस आयुक्तालयासमोर दोघांवर कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 23:44 IST