पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शुक्रवारी (दि. १०) पाणीपुरवठा बंद झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड गैरसोय झाली. स्वच्छतागृहात पाणी नसल्याने घाण साचली आणि सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. जलवाहिनी दुरुस्तीमुळे नेहरूनगर, संत तुकारामनगर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता, त्याचा फटका ‘वायसीएम’ला बसला.
वायसीएम रुग्णालयात दिवसरात्र रुग्ण येत असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघात आणि घातपाताच्या प्रकरणांची संख्या जास्त असते. त्यामुळे आपत्कालीन विभागासह तळमजल्यावरील स्वच्छतागृहांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वच्छतागृहातील पाणीपुरवठा बंद झाला. तो सायंकाळी पाच वाजता सुरू झाला, पण रात्री साडेअकरापर्यंतच तो चालला. त्यानंतर थेट शनिवारी सकाळी सहा वाजता पुन्हा पाणी आले. या दरम्यान रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली. वॉर्डमधील टाक्या भरून ठेवल्याने काही प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले, पण स्वच्छतागृहांसाठी पुरेसे पाणी नव्हते.
स्वच्छतागृहात घाण आणि दुर्गंधीचा त्रास
पाणी नसल्याने स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात घाण साचली. शनिवारी सकाळी रुग्णालयात लांबपर्यंत दुर्गंधी पसरली होती. साफसफाईसाठी पाणी नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
नवीन इमारतीतील टाकीची जोडणी रखडली
रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या नवीन इमारतीवर मोठी पाण्याची टाकी आहे. मात्र, या टाकीची जुन्या इमारतीशी नळजोडणी अद्याप झालेली नाही. हे काम २०२३ पासून प्रलंबित आहे. त्यामुळे रुग्णालयात वारंवार पाण्याचा तुटवडा निर्माण होतो.
मुख्य वाहिनीची दुरुस्ती सुरू असल्याने शहरातील काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. आम्ही दोन-दोन तास टाकीतून पाणी पुरवले. नवीन टाकीचा दाब जास्त येत असल्याने जोडणी झालेली नाही. याबाबत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. - डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
Web Summary : Water supply disruption at YCM Hospital caused immense inconvenience to patients and relatives. Lack of water led to unhygienic conditions in toilets. A new water tank connection is pending since 2023, exacerbating the shortage.
Web Summary : वायसीएम अस्पताल में पानी की आपूर्ति बाधित होने से मरीजों और रिश्तेदारों को भारी असुविधा हुई। पानी की कमी के कारण शौचालयों में अस्वच्छता फैल गई। एक नई पानी की टंकी का कनेक्शन 2023 से लंबित है, जिससे कमी और बढ़ गई है।