पिंपरी : क्रीडानगरी म्हणून ओळख निर्माण करण्याच्या घोषणा करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा क्रीडा विभागातील गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी १३ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली ‘खेळाडू दत्तक योजना’ गेल्या सात वर्षांपासून बंद आहे. धक्कादायक बाब म्हणजे, योजना बंद असूनही महापालिका दरवर्षी खेळाडूंकडून अर्ज मागवत असून, यामुळे खेळाडूंची निराशा होत आहे. प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिकेच्या क्रीडा विभागाने गेल्या वर्षी या योजनेसाठी अर्ज मागवले होते. ४७ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी प्रतिसाद दिला. मात्र, एक वर्ष उलटूनही एकाही खेळाडूला या योजनेचा लाभ मिळालेला नाही. आता पुन्हा एकदा १ ते १४ ऑगस्ट दरम्यान नवीन अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याची टीका खेळाडूंकडून होत आहे.
काय आहे खेळाडू दत्तक योजना?
ही योजना महापालिका हद्दीतील किमान तीन वर्षे रहिवासी असलेल्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसाठी आहे. याअंतर्गत निवड झालेल्या खेळाडूंना पीएमपीएमएल बसमधून मोफत प्रवास, सकस आहारासाठी भत्ता, खेळाचे साहित्य आणि गणवेश, फिजिओथेरपी आणि क्रीडा वैद्यकीय सुविधा, स्पर्धेत प्रावीण्य मिळाल्यास स्वतंत्र शिष्यवृत्ती मिळते.
प्रशासनाचा गलथान कारभार
खेळाडू आणि क्रीडा संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रीडा विभागातील काही कर्मचारी खेळाडूंमध्ये भेदभाव करतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीचे अहवाल देतात. या योजनेसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती असूनही, अर्ज समितीपर्यंत पोहोचवले जात नाहीत, त्यामुळे कोणताही निर्णय होत नाही. यामुळे होतकरू आणि गरजू खेळाडूंच्या कामगिरीवर गंभीर परिणाम होत असून, मैदानात जिंकूनही प्रशासनाच्या धोरणामुळे पराभूत झाल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी अर्ज केलेल्या ४७ खेळाडूंना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या वर्षीही अर्ज मागवण्यात आले असून, छाननी करून खेळाडूंना लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल. - पंकज पाटील, उपायुक्त, महापालिका