पिंपरी : जमिनीचे बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी चिंचवडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नरेश ठाकुरदास वाधवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना शुक्रवारी सायंकाळी अटक केली. शनिवारी सकाळी मोरवाडी येथील पिंपरी न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने वाधवानी यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी वाधवानी यांच्यासह तीन आरोपींपैकी विजय रामचंदानी आणि महेश क्रिपलानी या दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यांना पोलीस आणि न्यायालयीन कोठडीही देण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी नरेश वाधवानी मात्र अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविता न आल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ७ डिसेंबर २०१७ ला मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी नरेश वाधवानी यांना अटक केली.स्वर्गीय महादेव हरी कढे यांच्या नावे असलेली पिंपळे सौदागर येथील सर्व्हे क्रमांक ३९/२/२ येथील जमीन श्रद्धा असोसिएटस व भागीदार संस्थेला २००६ मध्ये विकसित करण्यासाठी दिली होती. ३१ आॅक्टोबर २००७ ला जमीन मालक कढे यांचा मृत्यू झाला. पिंपळे सौदागर येथील या जागेचे मंगलमूर्ती डेव्हलपर्सचे नरेश वाधवानी तसेच विजय रामचंदानी व महेश क्रिपलानी यांनी संगनमताने कढे यांच्या निधनानंतर ४ वर्षांनी अर्थात २०१० मध्ये बनावट खरेदीखत केले.असे केले बनावट खरेदीखतहयात नसलेल्या व्यक्तीच्या नावे बनावट सह्या करून खरेदीखत केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक वाधवानी यांच्यासह वकील विजय रामचंदानी व महेश क्रिपलानी यांच्याविरुद्ध शांताराम बर्डे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. २०१५ मध्ये चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.पिंपरी न्यायालयाने याप्रकरणी चौकशी करून पुढील कारवाई करण्याचे आदेश चिंचवड पोलिसांना दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार चिंचवड पोलिसांनी न्यायालयास अहवाल सादर केला. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना पुढील कारवाईचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली.
नरेश वाधवानींना पोलीस कोठडी, बनावट खरेदीखत प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 04:25 IST