पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का, घड्याळाच्या चिन्हावर लढणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या सूचक आणि सकारात्मक विधानांमुळे ही शक्यता अधिक बळावली असून, येत्या एक-दोन दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
शहरातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. २६) डॉ. अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोल्हे म्हणाले, महापालिकेतील भाजपच्या कथित भ्रष्ट कारभाराविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे. त्याअनुषंगाने महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि इतर सहकाऱ्यांशी चर्चा सुरू असून, अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार) एकत्र येऊन निवडणूक लढवणार का, तसेच राष्ट्रवादीच्या (अजित पवार) ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवली जाणार का, याबाबत विचारले असता डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले की, सध्या यासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही आणि तसा कोणताही अधिकृत प्रस्तावही आमच्यापर्यंत आलेला नाही.
संमतीनंतर राजकीय दिशा
आमदार रोहित पवार म्हणाले, बैठकीत कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेचा सविस्तर अहवाल खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्याकडे सादर केला जाणार आहे. वरिष्ठ नेत्यांच्या संमतीनंतरच पुढील राजकीय दिशा ठरवली जाईल. दोन्ही गट एकत्र येणार की नाही, याबाबतची अधिकृत घोषणा येत्या एक-दोन दिवसांत खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : NCP factions may unite to challenge BJP in Pimpri-Chinchwad municipal elections. Discussions are ongoing, and a decision is expected soon. Senior leaders will decide the future course.
Web Summary : पिंपरी-चिंचवड नगर निगम चुनाव में भाजपा को चुनौती देने के लिए NCP गुट एकजुट हो सकते हैं। चर्चा जारी है, जल्द ही निर्णय अपेक्षित है। वरिष्ठ नेता भविष्य की दिशा तय करेंगे।