देहूगाव : संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळा इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहचवणाऱ्या फेसबुक दिंडीच्या माध्यमातून यंदा जलसंधारणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.श्रीक्षेत्र देहू येथील संत तुकाराममहाराज संस्थानच्या सहकार्याने व सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील ‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम आॅफ इंडिया, बारामती’ यांच्या तर्फे पालखी सोहळ्याच्या काळात ‘फेसबुक दिंडीला’ लाइक, जॉइन करणाऱ्या प्रत्येक ई वारकऱ्यामागे एक रुपया अशी आर्थिक मदत केली जाणार आहे. आॅनलाइन तसेच वारीत चालणाऱ्या वारकरी, शेतकरी मित्रांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर मदत जलसंधारणाचे काम करणाऱ्या सामाजिक संस्थेस उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यातील टंचाईची तीव्रता विचारात घेता यंदा पालखीच्या माध्यमातून संस्कृती संगोपन आणि जनजागृती मोहीम सोबतच काही तरी मदत व्हावी, या उद्देशाने हा प्रस्ताव फोरमच्या प्रमुख पवार यांच्यापुढे फेसबुक दिंडी टीमने मांडला होता, असे स्वप्निल मोरे यांनी सांगितले. app.facebookdindi.com या लिंकवर दिंडीचे अॅप्लिकेशन डाउनलोड करता येईल.यासाठी फेसबुक दिंडी टीमचे स्वप्निल मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर कार्यरत आहेत. (वार्ताहर)
जलसंधारणासाठी होणार जागर
By admin | Updated: June 24, 2016 01:44 IST