पिंपरी : गेल्या आठवडाभरापासून आनंदनगर परिसरात पिण्याचे पाणी वेळेवर व पुरेसे येत नसल्यामुळे रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अधिकाऱ्यांना सांगूनही उपाययोजना केल्या जात नाहीत, असा आरोप करीत संतप्त झालेल्या रहिवासी महिलांनी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना घेराव घालून पाणीटंचाई सोडविण्याची मागणी केली. संतप्त झालेल्या रहिवाशांच्या समोरच आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून चांगलेच धारेवर धरले. त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा आदेश दिला. चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी भागात वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. उशिरा पाणीपुरवठा केला जात असून, तोही कमी दाबाने होत आहे. यामुळे रहिवाशांचा घरातील पिण्याचा व वापरण्याचाही साठा पूर्ण होत नाही. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, वयोवृद्ध महिलांचे हाल होत आहेत. या संबंधी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या ठिकाणी वेळेवर गटारींची व शौचालयांची स्वच्छता केली जात नाही. वेळेवर कचरा उचलला जात नसल्यामुळे, दुर्गंधी निर्माण होऊन, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या तक्रारींची प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी. या मागणीसाठी परिसरातील सुशिला वरेकर, सुशिला म्हस्के, माधुरी गायकवाड, आम्रपाली आव्हाळ यांच्यासह सुमारे ५० ते ६० रहिवासी महिलांनी रविवारी दुपारी एकच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरवले. स्थानिक नगरसेवक यांनीही पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना आनंदनगरातील पाणीटंचाईसह विविध समस्यांची माहिती देऊन, रविवार असूनसुद्धा प्रत्यक्ष पाहणीसाठी बोलावले. आयुक्त येत असल्याचे समजल्यावर संतप्त महिलांनी रास्ता रोको न करता आयुक्तांना घेराव घालविण्याचे ठरवले. दीडच्या सुमारास आयुक्त येताच महिलांनी घेराव घालून तक्रारी मांडायला सुरुवात केल्याने काही वेळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)
पाण्यासाठी महिलांचा आयुक्तांना घेराव
By admin | Updated: January 25, 2016 00:55 IST