पिंपरी : गुंतवणूकदाराची परवानगी न घेता शेअर मार्केटमध्ये परस्पर व्यवहार करून ६२ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काळेवाडी फाटा येथे घडली.वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभकुमार सिन्हा (रा. काळाखडक रोड, वाकड) आणि प्रशांत गिरासे (रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शशिकांत हनुमंत राक्षे (वय ५०, रा. भिकनसेठ पार्क, दापोडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १० नोव्हेंबर २०१८ ते १२ जून २०१९ या कालावधीत काळेवाडी फाटा येथे घडली. आरोपी सिन्हा व गिरासे हे एका कंपनी लिमिटेडचे सब ब्रोकर आहेत. ते क्लासेसही चालवितात. आरोपींनी फिर्यादी राक्षे यांना ऑफिसमध्ये वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. जास्तीत जास्त नफा होईल, असे आश्वासन देऊन डिमेट अकाऊंट सुरू केले. राक्षे व त्यांच्या कुटूंबियांच्या नावे ६५ लाख ६८ हजार ९९९ रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यापैकी ६२ लाख ८७ हजार १८३ रुपये राक्षे यांची परवानगी न घेता, तसेच कोणत्याही प्रकारची सूचना न देता परस्पर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग व्यवहार केला आणि राक्षे यांची फसवणूक केली.
परस्पर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ६२ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 18:04 IST
आरोपी हे एका कंपनी लिमिटेडचे सब ब्रोकर
परस्पर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ६२ लाखांचा गंडा
ठळक मुद्दे दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल