किवळे : देहूरोड -कात्रज पश्चिम बाह्यवळण महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यानंतर किवळे रावेत भागात महामार्गाच्या दुतर्फा मालवाहू वाहने उभी केली जात आहेत. मालवाहू वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा येत असून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महामार्गाचे सहापदरीकरण होऊनही वाहनचालकांच्या समस्या कायम असल्याने वाहतूक पोलिसांनी मालवाहू वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.देहूरोड - कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे व रावेत भागात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात हॉटेल व ढाबे असल्याने कंटेनर व मालवाहू वाहनचालक थांबत असतात. मात्र त्यांची वाहने सेवा रस्त्यावर अगर संबंधित हॉटेल व ढाबे यांच्यासमोर उभी न करता थेट महामार्गावरच उभी करीत असल्याने येथून होणाऱ्या जलद वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. अनेकदा या अनधिकृतपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे अपघात झाले असून, मालवाहू वाहने व कंटेनर उभी केलेल्या भागातून अचानक एखादे वाहन रस्त्यावर आणताना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणारी व द्रुतगती मार्गावरून पुणेमार्गे बंगळुरूकडे जाणारी मालवाहू वाहने द्रुतगती मार्गावर वाहने उभी करण्यास बंदी असल्याने तसेच त्या ठिकाणी अपघाताची शक्यता अधिक असल्याने संबंधित मालवाहू वाहनांचे चालक बाह्यवळण मार्गावर किवळे-रावेत भागात विश्रांतीसाठी थांबत असल्याचे दिसत असून, त्यामुळे महामार्ग सहापदरीकरण होऊनही महामार्गाचा वाहनतळासारखा वापर होऊ लागला आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या महामार्गावर कंत्राटदारामार्फत टोल आकारणी होत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित टोल कंत्राटदाराने व स्थानिक वाहतूक पोलिसांनी या भागातील राजरोसपणे धोकादायकपणे उभ्या करण्यात येणाºया मालवाहतूक वाहनांवर कारवाई करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांसह वाहनचालक करीत आहेत.
महामार्गावर अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 03:26 IST