महिला, नातेवाइकांचे ‘डीएनए’ झाले ‘मॅच’

By नारायण बडगुजर | Published: December 10, 2023 09:16 PM2023-12-10T21:16:25+5:302023-12-10T21:16:32+5:30

सर्व मृतदेह सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

dna of women relatives become match in pimpri | महिला, नातेवाइकांचे ‘डीएनए’ झाले ‘मॅच’

महिला, नातेवाइकांचे ‘डीएनए’ झाले ‘मॅच’

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : तळवडे येथील स्पार्कल कँडल बनिवणाऱ्या कंपनीत शुक्रवारी दुपारी स्फोट होऊन मृत झालेल्या सहा महिलांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे ‘डीएनए’ सॅम्पल मॅच झाले आहेत. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आहे. सर्व मृतदेह सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

तळवडेतील ज्योतिबानगर येथील शिवराज एंटरप्रायजेस या कंपनीत बेकायदेशीरपणे ‘स्पार्कल कँडल’ बनविण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून स्फोट झाला. यात सहा मजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला. मोठ्या तीव्रतेचा स्फोट असल्याने मृत महिलांच्या शरीराचा अक्षरश: कोळसा झाला. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. नातेवाईकांनाही त्यांची ओळख पटत नव्हती. त्यामुळे मृत सहा महिलांचे तसेच त्यांच्या नातेवाईकांचे असे एकूण १२ नमुने डीएनए चाचणीसाठी शनिवारी पुणे येथील न्याय वैद्यकीय सहाय्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. 

प्रयोगशाळेत एका डीएन चाचणीसाठी सुमारे १८ तास लागतात. त्यामुळे सहा महिलांचे डीएनए आणि त्यांच्या सहा नातेवाईकांचे डीएन यांची चाचणी घेऊन त्याचा अहवाल प्राप्त होण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहवाल लवकर उपलब्ध करून देण्यात आले. 

सर्व मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

मयत सहा महिलांचे मृतदेह पिंपरी येथे वायसीएम रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवले आहेत. त्यांच्या ‘डीएनए’ अहवाल रविवारी सायंकाळी प्राप्त झाला. मात्र, मृतदेह सोमवारी सकाळी नऊच्या सुमारस नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर सहा मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: dna of women relatives become match in pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.