निगडी : पवना नदीपात्रात ठेकेदाराने विनापरवाना बांध टाकल्याने संपूर्ण शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली. या गंभीर घटनेबाबत महापालिकेच्या रावेत येथील जलउपसा केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी तब्बल दोन दिवस अनभिज्ञ असल्याचे चव्हाट्यावर आले. नदीपात्रातून आवश्यक जलउपसा का होत नाही, याचे कारण शोधण्यासाठी हालचाली केल्या नाहीत. रावेत येथील जलउपसा केंद्रापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर पुनावळेजवळील पवना नदीपात्रात भराव टाकून पूल तयार झाला, याचा थांगपत्ताही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला लागला नाही. नदीपात्र अथवा लगतच्या भागात बांधकाम, बंधारा अशी कामे करायची असल्यास पाटबंधारे विभागाकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागते. हे तपासणेही पाटबंधारे विभागाचे काम आहे, असे सांगून महापालिकेने नदीपात्रातील भरावाबद्दल आपली जबाबदारी झटकली आहे. परंतु, ज्या रावेत जलउपसा केंद्रावरून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्या केंद्रावरील यंत्रणेत व्यत्यय आला, ही बाब तरी या केंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि तंत्रज्ञ यांच्या तरी लक्षात येणे आवश्यक होते. (वार्ताहर)
पालिका अधिकाऱ्यांची बेफिकिरी उघड
By admin | Updated: April 20, 2016 00:37 IST