तळेगाव दाभाडे : ५०० आणि १००० रूपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी तळेगाव शहर परिसरात सकाळपासूनच विविध बॅँकासमोर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. विशेषत: राष्टृीयकृत बॅँकांसमोर खातेदारांच्या लांबच लांब रांगा होत्या. दोन हजार रूपयांच्या नवीन नोटांचे नागरिकांना कुतूहल होते. आदेश असतानाही जादा वेळेचे पालन न करता तळेगाव स्टेशन येथील सिंडीकेट बॅँक या राष्टृीयकृत बॅँकेचा मुख्य दरवाजा साडेचार वाजताच बंद केल्याचे पहावयास मिळाले. बॅँकेबाहेर खातेदारांच्या रांगा लागल्या होत्या.खातेदार व रखवालदार यांच्यात शाब्दिक चकमकी उडत होत्या. जादा वेळेचे बंधन बॅँक का पाळत नाही याची विचारणा लोकमत प्रतिनिधीने शाखा व्यवस्थापकांकडे केली. त्यानंतर बॅँकेचा मुख्य दरवाजा खातेदारांसाठी पुन्हा खुला करण्यात आला. येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी माहिती देताना सांगितले की, सकाळी बॅँक सुरू होण्याआधीच खातेदारांनी पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी बॅँकेसमोर मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक वसंत बाबर घटनास्थळी दाखल झाले. खातेदारांना मार्गदर्शन करण्यात आले. पैसे भरणे व काढण्यासाठी दोन स्वतंत्र ओळी करण्यात आल्या. खातेदारांनी शिस्तीचे पालन करीत बॅँकेस चांगले सहकार्य केले. सायंकाळी सात वाजेपर्यंत बॅँकेचे कामकाज चालू होते. सुमारे दोन हजार खातेदारांनी याचा लाभ घेतला. दोन हजार रूपयांच्या नवीन नोटा उपलब्ध होऊ न शकल्याने खातेदारांची गैरसोय टाळण्यासाठी बॅँकेच्या वतीने शंभर रूपयांच्या नोटांचे वाटप झाले. (वार्ताहर)
दोन हजारांच्या नोटेबाबत कुतूहल
By admin | Updated: November 11, 2016 01:44 IST