पिंपरी : श्री संत तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातील एक दिवसाच्या मुक्कामानंतर शुक्रवारी पुण्याकडे मार्गस्थ झाला. सोहळ्यातील भाविकांची मनोभावे सेवा करून शहरवासीयांनी पालखी सोहळ्याला निरोप दिला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूला भाविकांनी गर्दी केली होती. तुकोबारायांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरीकडे मार्गस्थ होत आहे. श्रीक्षेत्र देहू येथून निघालेल्या या सोहळ्याचे गुरुवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. मुक्कामासाठी पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात होती. आकुर्डीला जत्रेचे स्वरूप आले होते. मंदिर व परिसरात नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू होता. रात्री देशमुख यांचे कीर्तन झाले, तर माई दिंडीचा जागर झाला. शुक्रवारी पहाटे चारच्यासुमारास पादुकांचे पूजन महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनीसपत्नीक, तसेच प्रमोद कुटे व अश्विनी कुटे यांच्या हस्ते केली. यानंतर भगवंताच्या भेटीसाठी निघालेले भाविक पहाटे पाच वाजताच पुढील मार्गाला निघण्यासाठीसज्ज झाले. (प्रतिनिधी)
दर्शनासाठी अलोट गर्दी
By admin | Updated: July 11, 2015 04:54 IST