पिंपरी - फेसबुकवरून कुटुंबाची माहिती मिळवून, त्याआधारे श्रीमंत कुटुंब असल्याची खात्री झाल्यानंतर ‘‘पाच लाख रुपये द्या, अन्यथा मुलीला पळवून नेऊन बरे वाईट करू ’’असे मुलीच्या आईला धमकावणाऱ्या दोन उच्चशिक्षित आरोपींना वाकड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पकडले. खंडणीची रक्कम नेण्यासाठी दिल्लीहून विमानाने पुण्यात आणि खासगी मोटार भाड्याने घेऊन काळेवाडी भागात आलेले दोन आरोपी पोलिसांनी जेरबंद केले. बीटेकपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या दोन खंडणीबहादरांना पोलिसांनी वेशांतर करून अत्यंत कौशल्याने पकडले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित विनोद यादव (वय २८, रा. दिल्ली) आणि अभिनव सतीश मिश्रा (वय २७, रा. दिल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. वाकड परिसरात उच्चभ्रू सोसायटीत राहणाºया एका कुटुंबाची माहिती या आरोपींनी फेसबुकवरून मिळवली. या कुटुंबातील २१ वर्षांची मुलगी आयटी कंपनीत नोकरी करते. ती घरातून किती वाजता बाहेर पडते. किती वाजता कामावरून परत घरी येते. याबद्दलची माहिती मिळवली. शिक्षणासाठी काही वर्षे पुण्यात राहिले असल्याने त्या सोसायटीची माहिती त्यांनी मिळवली होती. त्या आधारे आरोपींनी मुलीच्या आईला १९ सप्टेंबरला मोबाइलवरून संपर्क साधला. त्यांच्या मुलीबद्दल सर्व माहिती असल्याचे सांगितले. या मुलीचे अपहरण करून बरे वाईट करू शकतो, अशी भीती दाखवून पाच लाखांच्या खंडणीची मागणी त्यांनी केली. या कुटुंबीयांना पाच लाख रुपये रक्कम मोठी नाही़ ते पोलिसांना कळविणार नाहीत. सहज आपले इप्सित साध्य होईल, असे त्यांना वाटले. उच्चशिक्षित आणि तांत्रिक ज्ञान असल्याने त्यांनी याबाबतचा तांत्रिक पुरावा राहू नये, याची काळजी घेतली होती.मुलीच्या आईशी संपर्क साधताना ते सार्वजनिक दूरध्वनी सेवेचा वापर करीत होते. १९ सप्टेंबरपासून ते २१ सप्टेंबरपर्यंत सातत्याने मुलीच्या आईकडून खंडणीची रक्कम मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते. संबंधित महिलेने वाकड पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी व्यूहरचना आखली. खंडणीची रक्कम घेऊन येण्यासाठी आरोपी रेल्वे स्थानक अथवा विमानतळ येथे यावे, असा आग्रह धरीत होते. सार्वजनिक ठिकाणी आरोपींना ओळखणे आणि पकडणे कठीण असल्याने पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या माध्यमातून त्यांना काळेवाडी, वाकड परिसरात बोलावले. ते ज्या ठिकाणी येणार त्या ठिकाणी वेशांतर केलेल्या पोलिसांचे पथक तैनात होते.वेशांतर करून रचला सापळाखंडणीची रक्कम नेण्यासाठी येणाºया आरोपींना पकडण्यासाठी सहा अधिकारी आणि ४० पोलिसांचे खास पथक तयार केले होते. ज्या ठिकाणी आरोपी येणार त्या परिसरात हातगाडीजवळ फळविक्रेत्याची वेशभूषा केलेला एक पोलीस, पानटपरीजवळ साध्या वेशात थांबलेले काही पोलीस कर्मचारी, डॉक्टरची वेशभूषा केलेली महिला पोलीस कर्मचारी त्यांच्याबरोबर साध्या वेशातील काही पोलीस असलेली रुग्णवाहिका घेऊन आरोपींच्या प्रतीक्षेत पोलीस पथके तैनात होती. काळेवाडी फाटा येथील एका सोसायटीच्या आवारात खंडणीची रक्कम नेण्यासाठी आरोपी आले. अत्यंत सावधपणे ते तेथे वावरत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटताच फळविक्रेत्याच्या वेशातील पोलीस कर्मचाºयाने त्यातील एकाला रिक्षात बसत असतानाच पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.फेसबुकवरील वैयक्तिक माहितीचा दुरूपयोगखंडणीची रक्कम नेण्यासाठी दिल्लीहून विमानाने आले असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांना अटक केली असून, असे आणखी काही प्रकार त्यांनी केले आहेत का? याची चौकशी केली जात असल्याचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. व्हॉटसअॅप, फेसबुकवर वैयक्तिक माहिती टाकल्यास त्याचा दुरूपयोग होऊ शकतो. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती टाकण्याबाबतची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन आयुक्त पद्मनाभन यांनी केले.
खंडणीसाठी विमानाने आले... पोलिसांच्या मोटारीतून कोठडीत गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 01:52 IST