तळेगाव दाभाडे - येथील नगर परिषदेतील सत्तारूढ भाजपाचे नगरसेवक, अर्थ व नियोजन समितीचे सभापती अमोल जगन्नाथ शेटे (वय ४०) यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. नगर परिषदेचे सहायक अग्निशामक स्थानक पर्यवेक्षक पद्मनाभ सुधीर कुल्लरवार (वय ३४) यांनी शेटे यांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे.फिर्यादीत नमूद केले आहे की, बुधवार, दि. ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये तीन ते चार नगरसेवकांसमक्ष अमोल शेटे यांनी कारण नसताना दमदाटी करून अपमानित केले. वस्तुस्थिती काय आहे, याची खात्री केल्यानंतरच अमोल शेटे यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी दिली.अमोल शेटे याबाबत म्हणाले,नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी पद्मनाभ कुल्लरवार यांना स्वत:च्या केबिनमध्ये बोलावले. या वेळी पद्मनाभ यांच्याकडे अग्निशामक बंबाच्या विम्याच्या कागदपत्रांची मागणी केली असता, काय नाटक लावले आहे तुम्ही, तुम्ही काय थेरं करताय, काम तर काहीच करत नाहीत, असे उद्धट बोलून कुल्लरवार यांनी लोकप्रतिनिधींना अपशब्द वापरले.’’
तळेगावात भाजपा नेत्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 01:19 IST