पिंपरी : पुन्हा लॉकडाऊन केल्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी आज (शनिवारी) दुपारी १० हजारांचा टप्पा पार केला. त्यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखायचा कसा, असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोरोनाबाबत डॅशबोर्डवरून माहिती देण्यात येते. त्यानुसार शनिवारी दुपारी दोनपर्यंत २४५ रुग्णांचा कोरोना चााचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे रुग्णसंख्या १०१०२ झाली. दुपारपर्यंत इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी ६३५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच ३५८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १७१ रुग्णांचा मृत्यू झाला. शहराबाहेरील मात्र शहरातील रुग्णालयात उपचार घेताना ४७ रुग्ण दगावलेले आहेत. दरम्यान, महापालिका हद्दीत शुक्रवारी ६८६ रुग्णांचा कोरोना अहवाला पॉझिटिव्ह आला होता. गेल्या चार महिन्यांत एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळण्याचा हा उच्चांक होता. त्यापाठोपाठ शनिवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा पार केला. त्यामुळे हा धोक्याचा इशारा असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.