पिंपरी : मुलांनी पुस्तकाशी बोलायला हवे. त्यातूनच मोठे झाले पाहिजे. जीवनात कोणतीच भीती न बाळगता ध्येय, उद्दिष्टे गाठावीत. पूर्वग्रह न ठेवता संवाद साधला पाहिजे, असे मत संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी भोसरी येथे रविवारी व्यक्त केले. भोजापूर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेत ते बोलत होते. लांडेवाडी भोसरीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ कला, वाणिज्य महाविद्यालयातील कार्यक्रमास स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थापक आणि माजी आमदार विलास लांडे, उपाध्यक्ष अजित गव्हाणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे, धनंजय भालेकर, मारुती वाघमोडे, प्रताप खिरीड, प्राचार्य अशोक पाटील, उपप्राचार्य किरण चौधरी, मंदा आल्हाट, विनया तापकीर आदी उपस्थित होते. गव्हाणे म्हणाले, ‘‘भोसरीतील नागरिकांमध्ये व्याख्यानाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या ज्ञानसत्रांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी मोठे व्हावे, हाच खरा उद्देश आहे.’’या वेळी संस्थापक विलास लांडे यांच्या हस्ते खेड खालुंब्रे येथील प्राथमिक शाळेस संगणक भेट देण्यात आला. या वेळी मिलिंद क्षीरसागर यांनी सूपर्ण देशातील किल्ले, गड यांचे संवर्धन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. किल्ल्यांमुळेच महाराष्ट्र घडतो, असे ते म्हणाले. सचिव सुहास गटकळ यांनी स्वागत केले. त्यांनी गेल्या ११ वर्षांचा आढावा घेतला. सुनील थिगळे यांनी सूत्रसंचालन केले. हनमंत घारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
मुलांनी पुस्तकांशी बोलत मोठे व्हायला हवे : सलील कुलकर्णी
By admin | Updated: January 11, 2016 01:08 IST