पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात कलम वाढ करून नीलेश रामचंद्र चव्हाण (रा. कोथरुड, पुणे) याला देखील सहआरोपी करण्यात आले. पोलिसांकडून नीलेश चव्हाणचा शोध सुरू झाला आहे.
वैष्णवी शशांक हगवणे हिने १६ मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या बावधन पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १७ मे) गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता कलम ८० (२), १०८, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ११८ (१), ३ (५) प्रमाणे बावधन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत ठरणे असा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, वैष्णवी हिच्या मृत्यूनंतर तिचे दहा महिन्यांचे बाळ नीलेश चव्हाण याच्याकडे असल्याचे समोर आले. त्यानंतर वैष्णवीचे बाळ कस्पटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले. मात्र, नीलेश चव्हाण याच्याकडे असताना बाळाची हेळसांड झाली, अशी तक्रार कस्पटे कुटुंबियांनी केली. त्यानुसार बावधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली. वैष्णवी हिच्या आत्महत्येनंतर दाखल केलेल्या हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात ही कलम वाढ केली आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ या कायद्याच्या कलम ७५, ८७ प्रमाणे गुन्ह्यात कलम वाढ केली आहे.