हिंजवडी - मागील दहा दिवसात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारहिंजवडी आयटीपार्कच्या पाहणी दौऱ्यावर पुन्हा आले होते. मागील दौऱ्यात रस्ता रुंदीकरण आणि अतिक्रमण बाबत केलेल्या सूचनांवर नक्की काय कार्यवाही झाली याची त्यांनी पाहणी केली. यावेळी, माण आणि हिंजवडीच्या ग्रामस्थांनी गावठाण हद्दीत होणाऱ्या रस्ता रुंदीकरणाबाबत आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांनी कोणाचेही म्हणणे नीट ऐकून न घेता, ठरलेले रस्ता रुंदीकरण होणारच, या भूमिका वर ठाम राहिले.
दरम्यान शनिवार (दि.२६) रोजी सकाळी अजित पवार पुन्हा हिंजवडी आयटी पार्क मध्ये पाहणी दौऱ्यानिमित्त आले होते. यावेळी, त्यांनी पुन्हा आयटीपार्क मधील वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे आणि रस्ता रुंदी करण्याच्या कामांचा आढावा घेतला. मात्र गावठाण रस्ता रुंदीकरण बाबत अजित दादांनी घेतलेल्या सडेतोड भूमिके बाबत सकाळ पासूनच माण हिंजवडी परिसरात उलट सुलट प्रतिक्रिया उमटत असून, दादांनी किमान ग्रामस्थांच्या भावना व्यवस्थित ऐकून तरी घ्याव्यात अशी माफक अपेक्षा व्यक्त होत आहे. तर, आयटीतील वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरण व्यतिरिक्त, स्थानिक ग्रामस्थांच्या इतरही अनेक वर्ष प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी एवढीच आक्रमक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
वाहतूककोंडी समस्या सुटली पाहिजे. ह्याच्याशी आम्ही सुद्धा सहमत आहे. किंबहुना तशी आमची मागणी सुद्धा आहे. मात्र, रस्ता रुंदीकरण करताना किमान गावाठाण भागात स्थानिक ग्रामस्थांच म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्यांचा एकदा सहानुभूतीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.- सचिन आढाव, ग्रामस्थ, माण आज अजित पवार हे पाहणी दौरा करण्यासाठी आले होते. त्यांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतलीच नाही. अधिकार्यांनी त्यांना जे सांगितले होते त्यानुसार, ३६ मीटर रस्ता होणार त्यात काही बदल होणार नाही, असं संगितलं. यामुळे, स्थानिक ग्रामस्थांच्या भावना पायदळी तुडवल्या गेल्याची भावना व्यक्त होत आहे. - शिवाजी भिलारे, ग्रामस्थ, माण माण हिंजवडी रस्ता प्रशस्त व्हावा असं आम्हाला सुद्धा वाटतं. मात्र, किमान काही ठिकाणी, काय अडचण आहे, याबाबत, पवार यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन, त्यांचे म्हणणे जरा ऐकून घेणे गरजेचे आहे. - पांडुरंग राक्षे, ग्रामस्थ माण मागील एकवीस वर्षांपासून आयटीपार्क टप्पा क्रमांक चारसाठी प्रस्तावित भुसपादनांचे शेरे आमच्या सातबारावर दाखल आहेत, परंतु वेळोवेळी पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत आमच्या सातबारावरील शिक्का कमी झालेला नाही. याकडेही पवार यांनी एवढेच आक्रमक होऊन लक्ष देणे गरजेचे आहे. - मल्हारी बोडके, सचिव, माण गाव बचाव कृती समिती हिंजवडीचे सरपंच यांनी हिंजवडी गावठाण रस्ता रुंदीकरणाबाबत काही ग्रामस्थांच्या भावना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पवार यांनी ते व्यवस्थित ऐकून घेतले नाही. त्यांनी किमान ग्रामस्थांच्या भावना ऐकून घेणे गरजेचे आहे.- विक्रम साखरे, माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हिंजवडी