-ज्ञानेश्वर भंडारे पिंपरी : महापालिकेने चिखली, कुदळवाडीतील भंगार दुकाने, गोदामे, कंपन्या, हॉटेल, वर्कशॉप्स, बेकरी दुकानदार या व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडवरील कारवाईला पहाटे पाचपासूनच सुरवात केली आहे. कारवाईला विरोध करण्यासाठी व्यावसायिकांनी देहू- आळंदी रस्ता बंद केला आहे. तर पोलिसांनी व्यावसायिकांना नजरकैद केले असून महापालिकेची कारवाई सुरू आहे.
चिखली, कुदळवाडी परिसरात मोठ्या संख्येने अनधिकृत भंगार दुकाने आणि गोदामांसह इतर व्यावसायिक आस्थापना आहेत. या भागात वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील ५ हजार अनधिकृत आस्थापनांना महापालिकेच्या ‘क’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने नोटीसा बजावल्या आहेत. पंधरा दिवसांत स्वत:हून अनधिकृत बांधकाम व पत्राशेड काढून घेण्यास त्यांना सुचित केले होते. ती मुदत संपल्यानंतर महापालिकेने गुरूवारी (दि.३०) पासून कारवाई मोहीम सुरू केली होती. त्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, तेथील व्यावसायिक, दुकानदार व नागरिक मोठ्या संख्येने देहू-आळंदी रस्त्यावर जमा होऊन रास्ता रोको केला. त्यामुळे महापालिकेचे पथक गुरूवारी कारवाई न करता मागे फिरले.
दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि.३१) महापालिकेचे पथक पोलिस बंदोबस्तात कुदळवाडी येथे पोहचले; मात्र हजारोंच्या संख्येने व्यावसायिक, दुकानदार व नागरिक रस्त्यावर जमा झाले होते. त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला होता. व्यावसायिकांनी दुकान, गोदाम व वर्कशॉप काढून घेण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याची मागणी पोलिस अधिकार्यांकडे केली. मात्र, महापालिकेने सहा दिवसांची मुदत देत अतिक्रमणे काढायला सांगितले होते. ती मुदत शुक्रवारी (दि.०७) संपली. त्यामुळे शनिवारी (दि.८) पहाटेच महापालिकेने कारवाईस सुरवात केली. मोठा पोलिस बंदोबस्त आहे. कारवाई होणारच असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नेटवर्क बंद...कारवाई करण्यात येणाऱ्या परिसरात व्यापाऱ्यांनी मोबाईल वापरू नये यासाठी प्रशासनाकडून सकाळपासूनच नेटवर्क बंद ठेवण्यात आले. त्यामुळे या आम्हांला सगळ्यांपर्यंत निरोप पोहचविण्यात आला नसल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला. पोलिसांचा तगडा बंदोबस्त...या ठिकाणी पोलिस, तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक, राखीव दलाचे जवान आदींचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक दिवस आधीच पोलीस...व्यावसायिकांना दिलेली मुदत संपल्यानंतर महापालिकेने शुक्रवारी (दि.०७) पासूनच वाहनांवरुन सूचना देण्यास सुरुवात केली होती. तसेच राज्य राखीव दलाचे जवान व सुरक्षा रक्षकांची फौज एक दिसू आधीपासूनच तैनात करण्यात आली होती.