पिंपरी : देशातील शहरी भागामध्ये २४ तास वीजपुरवठा उपलब्ध असतो; परंतु आजदेखील ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना करावा लागतो आणि रात्र रात्र जागून शेतीला पाणी द्यावे लागते. ही देशभरातील शेतकऱ्यांची व्यथा खासदार श्रीरंग बारणे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेत मांडली. बारणे म्हणाले, ‘‘सध्याचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोळशापासून व अन्य वीजनिर्मितीच्या मार्गाने देशातील विजेचे उत्पन्न वाढल्याचे एकंदर अहवालावरून दिसते. परंतु देशभरातील शेतकऱ्याला आजदेखील लोडशेडिंगचा सामना करावा लागतो. वीजवाटप हा जरी राज्य सरकारच्या अखत्यारितील प्रश्न असला, तरी देखील शेतकऱ्यांना २४ तास वीज कधी मिळणार?’’ या तारांकित प्रश्नावर यावर केंद्रीय कोळसा खाण व ऊर्जामंत्री पीयूष गोयल म्हणाले, ‘‘विजेचे उत्पन्न मागील सरकारच्या तुलनेने वाढले आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील विजेवरील पूर्ण नियंत्रण हे जरी राज्याकडे असले, तरी केंद्रातून तशा सूचना देण्यात येतील.’’(प्रतिनिधी)
देशातील शेतकऱ्यांना २४ तास वीज कधी?
By admin | Updated: April 8, 2017 02:05 IST