शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:04 IST

1 / 6
ख्रिसमस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे लाल रंगाचे कपडे घातलेला, पांढरी शुभ्र दाढी असलेला आणि मुलांसाठी भेटवस्तूंचा ढिगारा घेऊन येणारा प्रेमळ 'सांता क्लॉज'. सांताला आपण आजवर फक्त टीव्ही, सिनेमा किंवा गोष्टींच्या पुस्तकात पाहिलं असेल. पण तुम्हाला माहीत आहे का, सांता क्लॉजचं एक खरंखुरं गाव देखील आहे? जिथे वर्षाचे ३६५ दिवस ख्रिसमस साजरा केला जातो. चला तर मग, या ख्रिसमसच्या निमित्ताने सांताच्या या सुंदर जगाची सफर करूया.
2 / 6
सांता क्लॉजचं अधिकृत गाव फिनलंडच्या लॅपलँड प्रदेशातील 'रोवानिएमी' या ठिकाणी आहे. या गावाला 'सांता क्लॉज विलेज' म्हणून ओळखलं जातं. हे ठिकाण आर्क्टिक सर्कलमध्ये येत असल्याने येथे वर्षभर बर्फाची पांढरी चादर पसरलेली असते. लाकडी घरं आणि त्यातून डोकावणारा उबदार प्रकाश एखाद्या परीकथेतील दृश्यासारखा वाटतो.
3 / 6
विशेष म्हणजे, रोवानिएमीमध्ये सांता क्लॉजचं स्वतःचं ऑफिस आहे. येथे सांता जगभरातून आलेल्या पर्यटकांना भेटतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. फिनलंडच्या लोककथेनुसार, सांताचा जन्म याच भागात झाला होता. आज हे गाव पर्यटनाच्या नकाशावर सांता क्लॉज विलेज म्हणूनच प्रसिद्ध आहे. येथील स्टाफ सांताप्रमाणेच कपडे घालून मुलांसाठी गिफ्ट पॅक करताना दिसतात.
4 / 6
सांताचा प्रवास आणि ख्रिसमसची धामधूम या गावात ख्रिसमसची खरी धामधूम २३ डिसेंबरपासूनच सुरू होते. 'सांता इज ऑन हिज वे' नावाचा एक मोठा कार्यक्रम येथे होतो. याच दिवशी सांता आपल्या रेनडियरने ओढल्या जाणाऱ्या गाडीत बसून भेटवस्तू वाटण्यासाठी जगाच्या प्रवासावर निघतो, अशी मान्यता आहे. सांताला भेटणं हा इथल्या पर्यटकांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव असतो.
5 / 6
सांताच्या गावात फक्त सांताच नाही, तर स्थानिक फिनलंडच्या खाद्यसंस्कृतीची मजाही घेता येते. येथील रेस्टॉरंट्समध्ये मिळणारे 'रेनडियर स्टू' आणि 'दालचिनी पेस्ट्री' जगभरात प्रसिद्ध आहेत. बाहेर पडणाऱ्या बर्फाच्या वर्षावात गरमागरम पेयांचा आस्वाद घेणं म्हणजे जणू स्वर्गीय सुखच!
6 / 6
तुम्ही सांताच्या गावी कसं जाऊ शकता? सांता क्लॉजच्या गावात पोहोचण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे जावे लागेल. तिथून तुम्ही विमानाने किंवा 'सांता एक्सप्रेस' नावाच्या खास ट्रेनने रोवानिएमीला पोहोचू शकता. हे एक उत्तम कौटुंबिक पर्यटन स्थळ असून येथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
टॅग्स :tourismपर्यटनChristmasनाताळ