शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 14:04 IST

1 / 8
बर्फाच्छादित डोंगररांगा, हिरवीगार वनराई, डल लेकमध्ये तरंगणारे शिकारा आणि अंगाला स्पर्श करणारी थंड हवा... काश्मीर म्हणजे प्रत्येकाच्या स्वप्नातील सहल! पृथ्वीवरचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या काश्मीरचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक गर्दी करतात.
2 / 8
मात्र, अनेकदा योग्य माहिती नसल्यामुळे पर्यटकांची मोठी आर्थिक फसवणूक होते किंवा सहलीचे बजेट अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने वाढते. जर तुम्हीही काश्मीरला जाण्याचा विचार करत असाल, तर काही सामान्य चुका टाळून तुम्ही तुमचे हजारो रुपये वाचवू शकता.
3 / 8
हॉटेल बुकिंगमध्ये घाई नको, आधी प्लॅनिंग करा : अनेक पर्यटक काश्मीरला गेल्यावर तिथे हॉटेल शोधू, असा विचार करतात. ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. ऐन सीझनमध्ये हॉटेल्सचे दर दुप्पट-तिप्पट होतात. त्यामुळे जाण्यापूर्वीच ऑनलाईन रिसर्च करून हॉटेल किंवा ट्रॅव्हल पॅकेज बुक करा. यामुळे तुमचे पैसे तर वाचतीलच, पण ऐनवेळी राहण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही.
4 / 8
टॅक्सीचे दर आधीच ठरवून घ्या : काश्मीरमध्ये फिरण्यासाठी टॅक्सी हा उत्तम पर्याय आहे, पण येथील टॅक्सीचे दर सीझननुसार बदलत राहतात. टॅक्सीत बसण्यापूर्वीच ड्रायव्हरशी भाड्याबाबत स्पष्ट बोलणी करा. शक्य असल्यास पूर्ण ट्रिपसाठी किंवा पूर्ण दिवसासाठी फिक्स रेट ठरवून घ्या, जेणेकरून नंतर होणारी वादावादी आणि जास्तीचे पैसे देण्याचे संकट टळेल.
5 / 8
खरेदी करताना घासाघीस अनिवार्य : काश्मीर म्हटलं की पश्मिना शाल, केशर, ड्रायफ्रूट्स आणि हस्तकलेच्या वस्तूंची खरेदी ओघाने आलीच. मात्र, टुरिस्ट स्पॉटवर या वस्तूंचे दर नेहमीच चढ्या भावाने सांगितले जातात. तिथे कोणतीही गोष्ट घेताना थोडे 'बार्गेनिंग' करणे अगदी सामान्य आहे. न लाजता योग्य भाव करा, यामुळे तुमची मोठी बचत होऊ शकते.
6 / 8
हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा : हवामानाची माहिती न घेता काश्मीरला जाणे महागात पडू शकते. 'पीक सीझन'मध्ये सर्व काही महाग असते, तर खराब हवामानामुळे अनेकदा रस्ते बंद असतात. अशा वेळी तुमचे पैसे खर्च होऊनही तुम्हाला प्रेक्षणीय स्थळे पाहता येत नाहीत. त्यामुळे निघण्यापूर्वी हवामानाचा अंदाज आणि पर्यटनासाठी योग्य काळ कोणता, याची खात्री नक्की करा.
7 / 8
अ‍ॅक्टिव्हिटीसाठी सरकारी दर तपासा : डल लेकमध्ये शिकारा राईड असो किंवा गुलमर्गमधील स्नो अ‍ॅक्टिव्हिटी, पर्यटकांकडून अनेकदा अवाच्या सव्वा पैसे उकळले जातात. प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटीचे सरकारी किंवा सर्वसामान्य दर काय आहेत, हे आधी जाणून घ्या. घाईघाईत कोणत्याही अमिषाला बळी पडू नका, अन्यथा सहलीचा आनंद खिशाला कात्री लावणारा ठरू शकतो.
8 / 8
काश्मीरची सहल ही आठवणींची शिदोरी असायला हवी, पश्चात्तापाची नाही. त्यामुळे वरील गोष्टी लक्षात ठेवून तुमच्या सहलीचे नियोजन करा आणि स्वर्गाचा अनुभव बजेटमध्ये घ्या!
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन