Serena Williams Retirement: 'टेनिस सम्राज्ञी' सेरेना विल्यमची निवृत्तीची घोषणा; 'हा' असेल शेवटचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 23:41 IST
1 / 6Serena Williams Retirement: २३ ग्रँड स्लॅम विजेतपद पटकावणारी स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने मंगळवारी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. सेरेनाने सांगितले की, ती टेनिसला रामराम करणार आहे आणि या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या यूएस ओपन (US Open) नंतर ती टेनिसला अलविदा करण्याच्या विचारात आहे. वर्षभर झालेल्या स्पर्धांमध्ये सहभाग न घेणाऱ्या सेरेनाने अखेर जूनमध्ये विम्बल्डनमधून पुनरागमन केलं होतं.2 / 6४० वर्षीय सेरेनाने पुनरागमन केल्यानंतर सोमवारी तिचा दुसरा एकेरीचा सामना खेळला. तो सामना टोरंटो ओपनमध्ये होता, तिथे सेरेनाने स्पेनच्या नुरिया पारिजास डायझचा पराभव करून दुसरी फेरी गाठली. सेरेनाने त्या सामन्यानंतर वोगसाठी लिहिलेल्या स्तंभात सांगितले की ती तिच्या टेनिस कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यावर आहे.3 / 6अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना म्हणाली, 'मला निवृत्ती हा शब्द कधीच आवडला नाही. हा मला ट्रेंडी शब्द वाटत नाही. मी याचा कधी विचार केला नव्हता. परंतु आता तो शब्द कसा वापरायचा याबद्दल मी खूप विचार करतेय. मी नक्की काय करणार आहे याचं आता वर्णन करायचं असेल तर मी म्हणेन की मी निवृत्त होण्यापेक्षाही विकासाच्या पुढच्या टप्प्यात पदार्पण करतेय.'4 / 6सेरेना म्हणाली, 'मी तुम्हाला हे सांगण्यासाठी स्तंभ लिहित आहे की मी आता माझ्या आयुष्यात टेनिसपेक्षाही महत्त्वाच्या असलेल्या इतर गोष्टींकडे वळत आहे. काही वर्षांपूर्वी, मी सेरेना व्हेंचर्स फर्म सुरू केली. त्यानंतर लगेचच मी माझे कुटुंब सेटल केले. आता मला त्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचंय आणि आमच्या कुटुंबाचा विकास करायचा आहे.'5 / 6सेरेना विल्यम्सने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे, 'जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडते तेव्हा त्या गोष्टी सोडणं नेहमीच कठीण असतं. मी टेनिसचा आनंद घेत आहे, पण आता काऊंटडाऊन सुरू झालं आहे. मला आता आईपणावर लक्ष द्यायचंय. माझ्या मुलाना जास्त वेळ द्यायचाय. एका वेगळ्या रोमांचक सेरेनाच्या शोधावर मी माझं लक्ष केंद्रित करणार आहे. तोपर्यंत पुढील काही आठवडे मी टेनिसचा आनंद लुटणार आहे.'6 / 6टेनिस सम्राज्ञी असं बिरूद शोभणाऱ्या सेरेना विल्यम्सने २०१७ मध्ये शेवटचे ग्रँडस्लॅम जिंकले. सेरेनाने सर्वाधिक २३ एकेरी ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून ती एक ग्रँड स्लॅम दूर आहे. २०१७ मध्ये मुलगी ऑलिम्पियाला जन्म दिल्यानंतर चार वेळा ती फायनलमध्ये पोहोचली पण तिथे ती पराभूत झाली. त्यामुळे सतत हुलकावणी देत असलेला हा विक्रम US Open मध्ये पूर्ण करून टेनिसला अलविदा करण्याचा तिचा मानस आहे.