कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:57 IST
1 / 8 Uttarakhand Is Moving Towards Disasters: उत्तराखंडला देवभूमी म्हणतात. देवभूमी म्हणजे, जिथे साक्षात देवांचा वास आहे. येथील मंदिरांसह विविध पर्यटनस्थळे मन मोहून टाकतात. येथील फुलांची पठारे, ढगांच्या चादरीने झाकलेले पर्वत, बर्फाच्छादित शिखरे, हिरव्यागार दऱ्या आणि घनदाट जंगले पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये उत्तराखंडमध्ये सातत्याने नैसर्गित दुर्घटना घडत आहेत.2 / 8 उत्तराखंडमध्ये हिमालयाच्या शिखरावरुन उगम पावणाऱ्या गंगा, यमुना, अलकनंदा, भागीरथी आणि ऋषिगंगा नदींना जीवनदायी मानले जाते. मात्र, या नद्यांच्या बाबतीत वारंवार नैसर्गित आपत्ती येत आहेत. गेल्या काही वर्षांत उत्तराखंडमध्ये महापूर, भूस्खलन, हिमनद्या तुटणे, भूकंप आणि जंगलातील भीषण आगीसारख्या घटना वारंवार घडत आहेत. या आपत्तींमुळे शेकडो लोक मृत्युमुखी पडलेच आहेत, शिवाय उत्तराखंडही हळूहळू उद्ध्वस्त होत आहे. आता प्रश्न असा आहे की, हे का घडत आहे? या घटना नैसर्गिक आहे की, मानवी चुकांमुळे घडत आहे?3 / 8 उत्तराखंडमध्ये नैसर्गिक आपत्ती नवीन नाहीत, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांची वारंवारता आणि तीव्रता सतत वाढत आहे. २०१३ च्या केदारनाथ दुर्घटनेत मंदाकिनी नदीत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे ५००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये चमोली येथे हिमनदी फुटून ऋषिगंगा आणि धौलीगंगा नद्यांमध्ये महापूर आला, यामुळे तपोवन धरण फुटून अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर २०२३ मध्ये पावसाळ्यात भूस्खलन झाले आणि नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होत आहे.4 / 8 संशोधकांचे म्हणणे आहे की, उत्तराखंडमधील विध्वंस हे केवळ नैसर्गिक कारण नाही, तर ते मानवी कारणांचे संयोजन आहे. उत्तराखंडमध्ये हिमालयीन पर्वतरांगा आहे, ज्या अजूनही भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय आहे. टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांशी आदळल्याने हिमालय दरवर्षी ४-५ मिलिमीटरने वाढत आहे. या टक्करमुळे भूकंपाच्या हालचाली होऊन खडक कमकुवत होतात. यामुळे भूस्खलन आणि पूर येण्याचा धोका वाढतो. अलकनंदा आणि भागीरथी नद्यांच्या काठावरील भागांना त्याचा धोका आहे. 5 / 8 २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अहवालात अल्पकालीन उच्च-तीव्रतेच्या पावसाच्या घटनांमध्ये (लहान ढगफुटी) वाढ झाल्याचे आढळून आले आहे. पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम राजीवन म्हणतात की, या डोंगराळ राज्यांसह सर्वत्र मुसळधार पाऊस वाढल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. हे जागतिक तापमानवाढीचे स्पष्ट लक्षण आहे. हा मुसळधार पाऊस आणि अचानक पूर अनपेक्षित नाही, परंतु डोंगराळ राज्यांमध्ये सर्वाधिक ढगफुटी होत आहेत. 6 / 8 हिमालयात जागतिक सरासरीपेक्षा जास्त तापमान वाढत आहे. यालाच भारदस्त तापमानवाढ म्हणतात. त्यामुळे ढगफुटीसारख्या घटना खूप सामान्य आहेत. उच्च तापमानात हवेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, अशा परिस्थितीत जास्त पाणी असलेले वारे पर्वतीय भागात जातात आणि मुसळधार पाऊस सुरू होतो. यालाच सामान्य भषेत ढगफुटी म्हणतात. २०१८ पासून पर्वतांवर अशा अनेक घटना दिसून येत आहेत. २०१३ पूर्वी केदारनाथमध्ये अशा दोन ढगफुटीच्या घटना घडल्या, एक अस्सी गंगा परिसरात आणि दुसरी उखीमठमध्ये. परंतु २०१८ पासून अशा घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. 7 / 8 पर्वतांवरील विकासामुळे अशा घटनांमध्ये खूप वेगाने वाढ झाली आहे. उत्तराखंडमध्ये वाढते पर्यटन, अनियोजित बांधकाम आणि जलविद्युत प्रकल्प राज्याला विनाशाकडे ढकलत आहेत. पर्वतांमध्ये रस्ते, बोगदे आणि धरणे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग केले जाते, ज्यामुळे तेथील खडक कमकुवत होतात आणि भूस्खलनाचा धोका वाढतो. दरवर्षी चार कोटींहून अधिक पर्यटक उत्तराखंडमध्ये येतात, विशेषतः चारधाम यात्रेवर. अशा परिस्थितीत जंगलतोड, कचरा आणि नैसर्गिक संसाधनांवर दबाव येतो.8 / 8 नैसर्गिक आपत्ती केवळ हवामान बदलामुळेच नव्हे तर मानवी हस्तक्षेपामुळे देखील उद्भवतात. वेळीच या सर्व गोष्टींवर उपाययोजना केल्या नाही, तर देवभूमी उत्तराखंडमध्ये अशा घटना वारंवार घडत राहतील आणि एक सुंदर राज्य उद्ध्वस्त होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.