Twin Towers Demolition: 'ट्विन टॉवर' जमीनदोस्त, पण शेजारील सोसायट्यांचं 'हे' नुकसान कधीच भरुन निघणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 13:01 IST
1 / 6नोएडातील सेक्टर ९३ एमधील सुपरटेकचे ट्विन टॉवर भ्रष्टाचारामुळे अनेक वर्षे वादात सापडले होते. अखेर न्यायालयाच्या निर्देशांनंतर ते पाडण्यात आले. मात्र यामुळे ज्या ग्राहकांनी येथे आपल्या स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न पाहिले त्यांच्या स्वप्नांचा यावेळी धुरळा उडाला, ज्यामुळे काही मिनिटे डोळ्यांसमोर फक्त धुळीचे साम्राज्य पसरले होते. ट्विन टॉवर उद्ध्वस्त करण्यासाठी ३७०० किलोपेक्षा अधिक स्फोटकांचा वापर करण्यात आला. यामुळे बाजूच्या इमारतींच्या काचाही काहीकाळ थरथरल्या... 2 / 6ट्विन टॉवर पाडण्यासाठी वेगवेगळ्या मजल्यांवर ३७०० किलो स्फोटके लावण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव एमराल्ड कोर्ट आणि लगतच्या सोसायट्यांचे फ्लॅट रिकामे केले आहेत. याशिवाय सुमारे तीन हजार वाहने आणि २०० पाळीव प्राणीही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली होते. 3 / 6सुपरटेकचे चेअरमन आर. के. अरोडा यांनी सांगितले की, ट्विन टॉवर इमारती पाडल्याने कंपनीचे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यात इमारतीच्या उभारणीपासून ते जमिनीची खरेदी, नोएडा प्राधिकरणाच्या मंजुरीचे शुल्क, बँकांच्या कर्जावरील व्याज आदींचा समावेश आहे. 4 / 6याशिवाय या टॉवरमध्ये फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १२ टक्क्यांनी व्याज द्यावे लागले आहे. या टॉवरमधील ९०० पेक्षा अधिक फ्लॅटची किंमत ७०० कोटी रुपये होती. ही इमारत पाडणाऱ्या एडिफिस इंजिनिअरिंगला सुपरटेक १७.५ कोटी रुपये देत आहे. 5 / 6ट्विन टॉवर पाडल्यानंतर आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. स्फोटाने इमारत उद्ध्वस्त झाल्यानंतर आजूबाजूच्या इमारतींवर काही परिणाम होईल, अशी भीती सर्वांनाच आहे. तसेच ट्विन टॉवरच्या आजूबाजूच्या इमारतीत राहण्यास भाडेकरु देखील आता विचार करतील. कारण यामुळे आजूबाजूच्या इमारती देखील हळुहळू कमकुवत होतील, असं नागरिकांमध्ये चर्चा आहे. तसेच ट्विन टॉवर पाडल्यानंतर नातेवाईक-मित्र परिवार यांचे फोन देखील वाढले आहे. तुमच्याच बाजूला ट्विट टॉवर होती, किती आवाज आला..सध्या काय सुरुय, असे प्रश्न ट्विन टॉवरच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विचारले जात आहे. 6 / 6सर्वोच्च न्यायालयानं ३१ ऑगस्ट २०२१ रोजी ट्विन टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यासाठी कोर्टानं ३ महिन्यांचा अवधी दिला होता. मात्र त्यानंतर तसे होऊ शकले नाही. त्यानंतर त्याची तारीख २२ मे २०२२ पर्यंत वाढवण्यात आली. पण टॉवर पाडण्याची तयारी पूर्ण झाली नाही, त्यामुळे टॉवर पाडण्याचं काम पुढे ढकलण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी टॉवर पाडणाऱ्या कंपनीला आणखी ३ महिन्यांची वाढीव मुदत दिली होती. त्यानंतर २१ ऑगस्ट २०२२ रोजी तो पाडायचा होता. मात्र त्यानंतर टॉवर पाडणाऱ्या एडफिस इंजिनिअरिंग कंपनीला एनओसी मिळाली नाही. त्यामुळे आणखी एक आठवडा मुदत वाढवून देण्यात आली. आता २८ ऑगस्टला टॉवर पाडण्यात येणार आहे.