शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:35 IST

1 / 11
'जेव्हा अंधार सर्वात गडद असतो, तेव्हाच प्रकाशाचा किरण सर्वात प्रखरतेने चमकतो.' राम भजन कुमार यांचं आयुष्य या सत्याचं चालतं-बोलतं उदाहरण आहे. वडिलांच्या निधनानंतर आयुष्यात असंख्य अडचणी आल्या. उदरनिर्वाहासाठी त्यांनी मजुरी केली, पण थकल्यानंतरही आशा सोडली नाही.
2 / 11
आपलं ध्येय गाठताना ते ७ वेळा नापास झाले, पण त्यांनी हार मानली नाही. अखेर UPSC च्या आठव्या प्रयत्नात यश मिळवून त्यांनी अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांची ही 'सक्सेस स्टोरी' सांगते की, मेहनत, संयम आणि अढळ निश्चयाने कठीण परिस्थितीतही स्वप्नं साकार होऊ शकतात.
3 / 11
राम भजन यांचा जन्म राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील बापी गावात झाला. त्यांनी बालपणापासूनच संघर्ष पाहिला होता. वयाच्या १४-१५ व्या वर्षी ते आई-वडिलांसोबत दगड फोडण्याचं काम करायला जात असत, ज्यामध्ये त्यांना अनेकदा जखमाही झाल्या.
4 / 11
परिस्थितीशी झुंजत ते पुढे जात राहिले, मात्र कोरोना महामारीच्या काळात त्यांच्या वडिलांचं निधन झाले. वडिलांच्या जाण्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली. घर चालवण्यासाठी त्यांना मजुरी करावी लागली.
5 / 11
आर्थिक आव्हानं आणि कामाच्या व्यापात त्यांनी आपलं १२ वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज केला होता. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांची निवड झाली.
6 / 11
दिल्ली पोलिसात भरती झाल्यानंतरही राम भजन यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं. नोकरी करत असतानाच त्यांनी राजस्थान विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. पोलीस दलातील नोकरी सांभाळून त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली.
7 / 11
ते दिवसभर ड्युटी करत आणि उरलेल्या वेळात स्वतःच्या नोट्स काढत असत. हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होता, पण त्यांच्या स्वप्नांच्या ओढीने त्यांना सतत पुढे जाण्याची प्रेरणा दिली. यादरम्यान त्यांचे लग्नही झाले, पण त्यांनी आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही.
8 / 11
'सेल्फ स्टडी'वर भर दिला आणि पूर्ण ताकदीनिशी अभ्यासात झोकून दिले. राम भजन यांनी २०१५ मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली. त्यात त्यांना अपयश आलं, पण त्यांनी हार मानली नाही. २०१६, २०१७ आणि २०१८ मध्येही त्यांनी सलग प्रयत्न केले.
9 / 11
२०१८ मध्ये ते मुख्य परीक्षेपर्यंत (Mains) पोहोचले, पण गुणवत्ता यादीत त्यांचं नाव आलं नाही. अपयशाचा हा काळ २०२१ पर्यंत सुरू राहिला. सलग ७ वेळा अपयशी ठरूनही त्यांनी कधीच हिंमत हारली नाही.
10 / 11
२०२२ मध्ये राम भजन यांनी ८ व्या वेळी UPSC ची परीक्षा दिली. त्यांची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तम झाली आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. निकाल लागला तेव्हा गुणवत्ता यादीत त्यांचं नाव झळकलं होतं. त्यांनी ऑल इंडिया रँक (AIR) ६६७ मिळवून आपलं स्वप्न सत्यात उतरवलं.
11 / 11
या यशामागे त्यांची मेहनत, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःवरील विश्वास होता. पोलीस खात्यातील नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना दररोज ७-८ तास अभ्यास करणं सोपं नव्हतं, पण त्यांनी ते करून दाखवलं.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी