1 / 5 Operation Sindoor: आज अखेर भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाच. भारतीय सैन्याने ऑपरेशन 'सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या प्रमुख तळांना लक्ष्य केले. यामध्ये अजमल कसाब आणि हेडली सारख्या दहशतवाद्यांना जिथे प्रशिक्षण दिले, त्या ठिकाणांचाही समावेश आहे.2 / 5 भारतीय लष्कराने त्यांच्या सोशल मीडिया हँडल X वर व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले की, 'न्याय झाला.' या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त झाल्याची पुष्टी सरकारने केली. सर्वात हाय-प्रोफाइल लक्ष्यांमध्ये लाहोरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरीदके शहरातील एक प्रमुख मरकझदेखील समाविष्ट आहे. हे लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय होते. याला 'मरकज-ए-तैयबा' असेही म्हणतात. हे मुख्यालय जमात-उद-दावा नावाच्या तथाकथित धर्मादाय संस्थेच्या नावाने चालते, परंतु तेथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जायचे.3 / 5 82 एकरांवर पसरलेल्या या कॅम्पसला अनेकदा पाकिस्तानची 'दहशतवादी नर्सरी' म्हणून संबोधले जाते. भारतीय भूमीवर हल्ल्यांच्या नियोजन येथूनच व्हायचे. बऱ्याच काळापासून भारतीय गुप्तचर संस्था यावर लक्ष ठेवून होत्या. हे केंद्र 2000 मध्ये स्थापन झाले आणि अल कायदाचा नेता ओसामा बिन लादेन याने त्याला 1 कोटी रुपयांचा निधी दिला होता. मरकझ हे हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील दहशतवादी संघटनेच्या कारवायांचे केंद्र आहे. या ठिकाणी गटाचे प्रचार केंद्र, शैक्षणिक संस्था, एक मदरसा, निवासस्थाने आणि धार्मिक प्रशिक्षण, शस्त्रास्त्र प्रशिक्षण आणि भरतीसाठी सुविधा आहेत.4 / 5 भारतीय गुप्तचर अहवालांनी स्थानिक आणि परदेशी तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात या मरकझची भूमिका वारंवार अधोरेखित केली आहे. दरवर्षी सुमारे 1000 तरुण यात सामील होत असल्याचीही माहिती आङे. या संकुलात पुरुष भरतीसाठी सुफा अकादमी आणि महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र आहे. हे लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वासाठी प्रशिक्षण शिबिर म्हणून देखील काम करते. 2008 च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना येथेच प्रशिक्षण देण्यात आले होते. 5 / 5 भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात मुझफ्फराबादमधील लष्करच्या सवाई नाला प्रशिक्षण केंद्रालाही लक्ष्य करण्यात आले. सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी येथे प्रशिक्षण घेतले होते. याशिवाय मुजफ्फराबादमधील सय्यदना बिलाल कॅम्पवरही हल्ला झाला. या छावणीचा वापर दहशतवाद्यांना शस्त्रे, स्फोटके आणि प्रशिक्षण देण्यासाठी केला जात होता. तर, गुरपूरच्या कोटली येथील लष्करची छावणीही उद्ध्वस्त झाली आहे. तसेच, भिंबरमधील बर्नाला कॅम्प, कोटलीमधील अब्बास कॅम्पला लक्ष्य करण्यात आले. सियालकोटचा सरजल कॅम्प देखील उद्ध्वस्त करण्यात आला. या छावणीतून प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांनी मार्च 2025 मध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या केली होती.