भारताला 'बाय-बाय'! ५ वर्षांत ९ लाख भारतीयांनी सोडलं नागरिकत्व; परदेशात स्वच्छ हवा आणि चांगल्या आयुष्याचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 21:08 IST
1 / 9गेल्या १४ वर्षांतील आकडेवारी पाहता, भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, विशेषतः २०२२ नंतर दरवर्षी २ लाख भारतीय आपला पासपोर्ट सरकारला परत करत आहेत. 2 / 9संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, २०११ ते २०२४ या काळात एकूण २० लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले, त्यापैकी निम्मे नागरिकत्व गेल्या ५ वर्षांत सोडले गेले आहेत.3 / 9आकडेवारीनुसार २०११ ते २०१९ दरम्यान, दरवर्षी सरासरी १.२ ते १.४५ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले. तर २०२० मध्ये कोरोना काळात हा आकडा ८५,००० पर्यंत खाली आला. २०२२ पासून पुढे दरवर्षी २ लाखांहून अधिक भारतीय परदेशी नागरिकत्व स्वीकारत आहेत. गेल्या १४ वर्षांत २० लाख ६० हजार भारतीयांनी भारतीय पासपोर्टचा त्याग केला.4 / 9पंतप्रधान कार्यालयाचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी या परिस्थितीला यशस्वी लोकांचे पलायन असे म्हटले आहे. त्यांच्या मते, आता केवळ डॉक्टर किंवा इंजिनिअरच बाहेर जात नाहीत, तर अतिश्रीमंत आणि प्रभावशाली वर्गातील लोकही देश सोडून जात आहेत. मॉर्गन स्टॅनलीच्या आकडेवारीनुसार, २०१४ पासून सुमारे २३,००० भारतीय करोडपतींनी देश सोडला आहे.5 / 9भारतीय कायद्यानुसार (कलम ९) कोणताही नागरिक एकाच वेळी दोन देशांचा पासपोर्ट बाळगू शकत नाही. त्यामुळे परदेशात स्थायिक झालेल्यांना तिथले नागरी हक्क मिळवण्यासाठी नाईलाजाने भारतीय नागरिकत्व सोडावे लागते.6 / 9प्रदूषित हवा, वाहतूक कोंडी, निकृष्ट सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे श्रीमंत आणि मध्यमवर्ग दिल्ली-मुंबईसारखी शहरे सोडून परदेशातील स्वच्छ हवा आणि चांगल्या नागरी सुविधांकडे वळत आहेत. 7 / 9आयआयटीमधील दर ३ पैकी १ विद्यार्थ्याला परदेशात काम करण्याची ओढ असते. भारतात त्यांच्या कौशल्याला मिळणारा मोबदला परदेशाच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे मानले जाते. सर्वंकष विकास आणि प्रगत शिक्षण पद्धतीसाठी पालक पाल्यांना परदेशात पाठवण्याला पसंती देत आहेत.8 / 9परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यानंतर भारतीय वंशाच्या लोकांना 'ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया' दर्जा मिळतो. यामुळे त्यांना व्हिसाशिवाय भारतात येता येते आणि आर्थिक व्यवहार करता येतात. मात्र, त्यांना भारतात मतदान करण्याचा, निवडणूक लढवण्याचा किंवा घटनात्मक पदावर बसण्याचा अधिकार नसतो.9 / 9भारतातून बाहेर पडणारा हा वर्ग अत्यंत उच्चशिक्षित आहे. अमेरिकेतील आकडेवारीनुसार, ८१% भारतीय स्थलांतरितांकडे किमान पदवी आहे. एकीकडे भारत जगातील सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश असला, तरी देशातील बुद्धिमत्ता आणि संपत्ती बाहेर जाणे ही चिंतेची बाब ठरत आहे.