शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धोक्याची घंटा! वानखेडे स्टेडियमच्या दहा पट जमीन समुद्राने कायमची गिळून टाकली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 8:34 AM

1 / 7
गेल्या तीन दशकांत विविध कारणांमुळे हवामानात मोठ्या प्रमाणत  झालेल्या बदलाने रायगड जिल्ह्यातील देवघरच्या किनारपट्टीचा ५५ हेक्टर भागावर समुद्राच्या पाण्याने कायमची मालकी केली आहे. या भागाचे आकारमान मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या दहा पट आहे. सॅटेलाइट प्रतिमांच्या अभ्यासानंतर ही बाब संशोधकांनी समोर आणली आहे.  
2 / 7
पुण्यातील सृष्टी कॉन्झर्व्हेशन फाउंडेशनने ही माहिती समोर आणली. बाणकोट खाडीच्या मुखाशी केलेल्या अभ्यासात प्राथमिक आकडेवारीनुसार १९९० ते २०२२ या कालावधीत सुमारे ५५ हेक्टरची किनारपट्टीवरील परिसंस्था नष्ट झाली आहे. यात खारफुटी, छोट्या खाड्या, दलदली, वाळूचे किनारे यांचा समावेश आहे.
3 / 7
जवळपास ३०० मीटर किनाऱ्याची धूप झाली आहे. योग्य उपाययोजना आवश्यक आहेत. सॅटेलाइटने निश्चित केलेला किनारा ३०० ते ५०० मीटर जमिनीच्या बाजूला सरकल्याचे निरीक्षण आहे. किनारपट्टीची धूप झाल्याने खारफुटी, सुरुची झाडेही उन्मळून पडली. हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढल्याने ही परिस्थिती अधिक बिकट होणार आहे.
4 / 7
सागरी किनारपट्टीच्या बदलत्या भूभाग रचनेला हाताळणे, उपाययोजना करणे गरजेचे आहे असं सृष्टी कॉन्झर्व्हेशन फाउंडेशनचे डॉ. दीपक आपटे यांनी म्हटलं. गेल्या वर्षी मुंबई महानगर क्षेत्रालगत असलेल्या खाड्या व जलमार्गांची रुंदी कमी होण्यासंदर्भातील मूल्यमापन आणि करंजा खाडीलगतच्या ६० चौरस फुटांहून अधिक खारफुटीचे क्षेत्र आकुंचित झाल्याचे समोर आले होते.
5 / 7
२०५० सालापर्यंत नरिमन पॉइंट, मंत्रालयाचा ८० टक्के परिसर पाण्याखाली जाईल. कफ परेड, मंत्रालय, चर्चगेट, नरिमन पॉइंट, उमरखाडी, मोहम्मद अली रोड, मरिन लाईन्स, गिरगाव, ब्रीच कँडी असा बराचसा ७० टक्के भाग २०५० पर्यंत जागतिक तापमान वाढीमुळे पूराच्या पाण्याखाली जाणार आहे. 
6 / 7
वेगवेगळ्या अहवालात समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून मुंबईसारखी शहरे पाण्याखाली जातील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. याचा फटका समुद्र किनारी राहणा-या लाखो लोकांना बसणार आहे. अतिवृष्टींच्या घटनांतदेखील वाढ होणार आहे.
7 / 7
धोके काय? किनाऱ्याची धूप आणखी वेगाने होईल. समुद्राचे पाणी गावांमध्ये अधिक वेगाने शिरेल. किनारपट्टी व्यवस्थापन धोरणावर लक्ष आवश्यक आहे. खोली व जलपातळी राखण्यासाठी खाडीभागात शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करावे लागेल.