एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 11:06 IST
1 / 9शनिवारी लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीनं निर्विवाद यश मिळवलं. त्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटानेही ५७ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. २०२२ बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांसह शिंदे गटाचे आणखी काही नवे आमदारही निवडून आले. मात्र त्या बंडात शिंदेंना साथ देणाऱ्या काही आमदारांना मात्र पराभवाचा धक्का बसला. 2 / 9२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या शिवसेनाती ४० आमदारां पैकी ५ आमदारांवर पराभवाची नामुष्की ओढवली. तर तेव्हा शिंदेंना साथ देणाऱ्या अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील काही नेतेही पराभूत झाले आहेत. एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या आणि या निवडणुकीत पराभूत झालेल्या आमदारांची यादी पुढीलप्रमाणे.3 / 9२०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले आणि ‘’काय झाडी, काय डोंगार…” मुळे प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटीला यांना सांगोला विधानसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. शहाजीबापू पाटील यांना शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांच्याकडून तब्बल २५ हजार ३८६ मतांनी पराभव पत्करावा लागला. 4 / 9एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांपैकी पराभूत झालेले दुसरे आमदार आहेत ते म्हणजे सदा सरवणकर. माहिम विधानसभा मतदारसंघात झालेल्या हायहोल्टेज लढतीमध्ये सदा सरवणकर यांना शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांच्याकडून १३१६ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. माहिमच्या जागेवरून महायुती आणि मनसेमध्ये सुरुवातीपासूनच गोंधळाचं वातावरण होतं. अखेर त्याचा फटका सरा सरवणकर आणि मनसेच्या अमित ठाकरे यांना बसला.5 / 9एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांपैकी पराभूत झालेले तिसरे आमदार आहेत ते म्हणजे संजय रायमुलकर. मेहकर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या संजय रायमूलकर यांना शिवसेना ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांनी ४ हजार ८१९ मतांनी पराभव केला. 6 / 9शिवसेनेतील बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदार ज्ञानराज चौगुले यांनाही मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला. उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्ञानराज चौगुले यांना शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवीण स्वामी यांनी ३ हजार ९६५ मतांनी पराभूत केले. 7 / 9शिवसेनेतील बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदार यामिनी जाधव यांनाही पराभवाचा धक्का बसला. मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये यामिनी जाधव यांना शिवसेना ठाकरे गटाते मनोज जामसुतकर यांनी ३१ हजार ३३१ मतांनी पराभूत केले. 8 / 9एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडावेळी साथ देणाऱ्यांमध्ये शिवसेनेतील आमदारांसोबत अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचाही समावेश होता. बच्चू कडू यांनाही या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा १२ हजार १३१ मतांनी पराभव केला. 9 / 9२०१९ च्या निवडणुकीत मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या गीता जैन यांनीही शिवसेनेतील बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. मात्र यावेळी गीता जैन यांना शिंदे गट किंवा भाजपाकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्या अपक्ष म्हणून रिंगणात होत्या. या मतदारसंघात भाजपाचे नरेंद्र मेहता विजयी झाले. तर गीता जैन ह्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.