शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:05 IST

1 / 12
Ladki Bahin Yojana eKYC News: राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी येत्या १८ नोव्हेंबरपूर्वी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. महिलांनी या कालावधीत आपले ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.
2 / 12
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १८ सप्टेंबर २०२५ पासून ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
3 / 12
उर्वरित लाभार्थी महिलांनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावे अशी अट टाकली आहे. मात्र अनेक अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने ई केवायसी बंधनकारक केले आहे.
4 / 12
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिने उलटले तरी अद्याप अर्ध्याही लाभार्थी महिलांचे ईकेवायसी पूर्ण झालेले नाही. तांत्रिक अडचणींमुळे २.४० कोटी महिलांपैकी केवळ ८० लाख महिलांचेच ईकेवायसी पूर्ण झाले आहे, त्यामुळे विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
5 / 12
महिला व बालविकास विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेत सध्या दोन कोटी ४० लाख महिला लाभ घेत आहेत. १८ सप्टेंबर महिन्यापासून या महिलांचे ईकेवायसी करण्यास सुरुवात झाली. मात्र कधी ओटीपी येण्यात अडचण तर कधी आधार संलग्नतेतील अडचणींमुळे महिलांना ईकेवायसीत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
6 / 12
लाडकी बहीण योजनेतील ८० लाख महिलांचे ईकेवायसी पूर्ण झाले आहे. १८ नोव्हेंबरआधी ईकेवायसी पूर्ण करण्याचे आव्हान असून त्यासाठी जनजगागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. पुढील आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त महिलांचे ईकेवायसी पूर्ण करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
7 / 12
ही योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी १८ सप्टेंबरपासून ईकेवायसी करण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवून प्रतिदिन ५ लाख ऐवजी प्रतिदिन १० लाख करण्यात आली आहे. दूर झालेल्या तांत्रिक अडचणी व सर्व्हरची वाढलेली क्षमता पाहता १८ नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांचे ईकेवायसी पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे म्हटले जात आहे.
8 / 12
मात्र, काही प्रमाणात लाभार्थ्यांची ईकेवायसी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. विधवा तसेच घटस्फोटीत महिलांना ईकेवायसी करण्यात मोठी अडचण येत आहे. पती तसेच वडीलही हयात नसल्याने त्यांना ईकेवायसी करण्यात येत नसल्याच्या तक्रारी विभागाकडे येत आहेत.
9 / 12
लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांपैकी २६ लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबविण्यात आले होते. या लाभार्थ्यांची ओळख निश्चित झाल्यानंतर २० लाख लाभार्थ्यांचे पैसे सुरू करण्यात आले. मात्र अद्यापही सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही. विविध विभागांत सात हजार सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीणचा लाभ घेतल्याचे आढळले आहे.
10 / 12
या महिला कर्मचाऱ्यांची यादी महिला व बालविकास विभागाकडून संबंधित विभागांकडे पाठविण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून पैसेही वसूल करण्यात येणार आहेत. १२ हजार पुरुष लाभार्थी यात सापडले असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
11 / 12
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून एका वर्षात ४३ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. लाडकी बहीण योजनेत सरकारने छाननी प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारकडून काही नियमात या योजनेच्या बदल करण्यात आल्याने लाभार्थी महिलांच्या संख्येत घट झाली.
12 / 12
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून १६४.५२ कोटी रुपयांचा लाभ उकळल्याचे समोर आले आहे. सध्याच्या घडीला २.४१ कोटी महिला या योजनेचा लाभ घेत असून, आतापर्यंत महिला व बालकल्याण विभागाने २६.३४ लाख संशयित खाती वगळली आहेत.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाMahayutiमहायुतीState Governmentराज्य सरकार