By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 17:52 IST
1 / 10राज्याच्या विरोधी पक्षनेता या पदावर असणाऱ्या व्यक्तीला साधारणत: मंत्रालयासमोरील बंगला दिला जातो. फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील मंत्रालयासमोरील बंगल्यात राहत होते. 2 / 10मात्र २०१९ सत्तांतरानंतर राज्यात विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली. फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार मलबार हिल येथे असणारा सागर हा सरकारी बंगला फडणवीसांना वितरीत करण्यात आला. 3 / 10राज्यात अडीच वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा सत्तांतर झाले. त्यामुळे शासकीय निवासस्थाने अदलाबदली करण्यात आले आहे. अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. राज्यात गेल्या एक महिन्यापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते इतकेच घटनात्मक पदावरील लोक काम करत आहेत. 4 / 10प्रथा-परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगला दिला जातो. परंतु सध्याचे मुख्यमंत्री त्यांच्या आधीच्या नंदनवन बंगल्यात राहत आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर या बंगल्यावरच वास्तव्यास आहेत. अद्याप बंगल्याचे वितरण झाले नाही. 5 / 10मात्र काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विनंती करत ते सध्या राहत असलेला देवगिरी बंगला त्यांना वास्तव्यासाठी द्यावा अशी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यामुळे ही विनंती सरकारने मान्य केली आहे. 6 / 10शासनाने परिपत्रक काढत देवगिरी बंगला अजित पवार यांना देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी देवगिरी बंगला हा उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ मंत्री यांच्यासाठी वाटप केल्याचे दिसून येते. परंतु यंदा हा बंगला विरोधी पक्षनेता यांना वितरीत करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. 7 / 10शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयाने आधीच्या प्रथा-परंपरेला छेद मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे पुर्वोधाहरण होणार नाही व यापुढेही तो पायंडा पडणार नाही या अटीच्या अधीन राहून हा निर्णय सरकारने घेतला आहे. 8 / 10अजित पवार हे विरोधी पक्षनेते, विधानसभा या पदावरून मुक्त झाल्यानंतर त्यांना वाटप केलेला बंगला पंधरा दिवसांच्या कालावधीत रिक्त करून देणे बंधनकारक राहील असंही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 9 / 10काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळापासून देवगिरी बंगल्यात अजित पवारांचे वास्तव्य आहे. २०१४ मध्ये सत्ता गेल्यानंतर हा बंगला सुधीर मुनगंटीवार यांना दिला होता. परंतु २०१९ च्या सत्तांतरानंतर पुन्हा एकदा देवगिरीवर अजित पवार राहायला आले. देवगिरी बंगला अजितदादांच्या पसंतीतील आहे. 10 / 10आता विरोधी पक्षात असताना देवगिरी बंगला अजित पवारांना देण्यात आल्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मलबार हिल परिसरातील आपल्या आवडीचे बंगले मिळावे यासाठी अनेक मंत्री लॉबिंग करत असतात. देवगिरी हा बंगला प्रमुख बंगल्यापैकी एक आहे. ज्याची सर्वाधिक मागणी केली जाते. परंतु तो केवळ काही खासच लोकांना दिला जातो.