ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:34 IST
1 / 8liechtenstein Richest Country Of Europe: पृथ्वीवर स्वर्ग आहे. तुमचा विश्वास बसत नसेल, तर युरोपमधील एका छोट्याशा देशाकडे पाहा. नैसर्गिक सौंदर्य, संपन्नता आणि शांततेसाठी ओळखला जाणारा लिक्टेंस्टाइन (Liechtenstein) हा देश सौंदर्याच्या बाबतीत स्वित्झर्लंडपेक्षाही पुढे आहे. विशेष म्हणजे, स्वतःचे चलन आणि विमानतळ नसलेल्या देशातील प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत हा देश जगात अव्वल स्थानी आहे.2 / 8आल्प्सच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य देश- ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड यांच्या दरम्यान आल्प्स पर्वतरांगांमध्ये वसलेला लिक्टेंस्टाइन हा युरोपमधील एक छोटा, पण अत्यंत सुंदर देश आहे. हिरव्यागार दऱ्या, बर्फाच्छादित डोंगर आणि शांत वातावरणामुळे हा देश पर्यटकांचे आकर्षण ठरतो. विशेष म्हणजे, लिक्टेंस्टाइनमध्ये स्वतःचे विमानतळ नाही. येथे जाण्यासाठी स्वित्झर्लंडपर्यंत विमानाने जावे लागते.3 / 8स्वतःची भाषा आणि चलन नाही...- लिक्टेंस्टाइनला स्वतंत्र अधिकृत भाषा किंवा स्वतःचे चलन नाही. येथे प्रामुख्याने जर्मन भाषेचा वापर होतो आणि स्विस फ्रँक हे चलन चालते. तरीही हा देश युरोपमधील सर्वाधिक श्रीमंत देशांपैकी एक मानला जातो.4 / 8राजेशाही आणि संसदीय व्यवस्था- लिक्टेंस्टाइन हा एक राजेशाही देश असून, येथे राजकुमाराची भूमिका अत्यंत प्रभावी आहे. 2003 मध्ये झालेल्या घटनात्मक जनमतसंग्रहानंतर राजकुमाराचे अधिकार अधिक मजबूत झाले. देशात मानवी हक्क आणि नागरी स्वातंत्र्यांचा आदर केला जातो. विशेष बाब म्हणजे, येथील राजकुमाराची संपत्ती ब्रिटनच्या राजघराण्यापेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जाते.5 / 8नागरिकांकडे अफाट संपत्ती- लिक्टेंस्टाइनमधील नागरिकांकडे इतकी संपत्ती आहे की, अनेकांना आयुष्यभर नोकरी करण्याची गरजच भासत नाही. लोक प्रामुख्याने आपल्या आवडीचे काम किंवा छंद जोपासतात. कमी करप्रणाली आणि कोणतेही बाह्य कर्ज नसणे, हे येथील समृद्धीचे मोठे कारण आहे. जगातील मोठ्या प्रमाणावर बनावट दात (डेंटल प्रॉस्थेटिक्स) यांचे उत्पादन आणि निर्यात याच देशातून होते.6 / 8जवळपास ‘झिरो क्राईम’ देश- लिक्टेंस्टाइन हा जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक मानला जातो. येथे गोंगाट करणे किंवा शेजाऱ्यांना त्रास देणे सामाजिकदृष्ट्या अयोग्य मानले जाते. पैशाचे प्रदर्शन करणेही चांगले समजले जात नाही. गुन्हेगारी इतकी कमी आहे की, अनेक लोक घरांना कुलूपही लावत नाहीत. येथील तुरुंगात मोजकेच कैदी असून, त्यांना रेस्टॉरंटमधून जेवण दिले जाते.7 / 8जगात सर्वाधिक प्रति व्यक्ती जीडीपी- या देशाची लोकसंख्या 40 हजारांपेक्षा कमी असून, पोलिसांची संख्याही 100 पेक्षा कमी आहे. लिक्टेंस्टाइनकडे स्वतःचे सैन्यदलही नाही. येथील नागरिकांना अनेक देशांच्या तुलनेत अधिक सामाजिक आणि आर्थिक सुविधा मिळतात. बहुतांश सेवा क्षेत्रातील कर्मचारी ऑस्ट्रिया आणि जर्मनीमधून येतात. एका अंदाजानुसार, 2025 मध्ये लिक्टेंस्टाइनची प्रति व्यक्ती जीडीपी (नाममात्र) सुमारे 2,31,713 डॉलर आणि पीपीपीच्या आधारे 2,01,110 डॉलर इतकी आहे. त्यामुळे हा देश जगात प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे.8 / 8स्वर्गसमान अनुभवासाठी लिक्टेंस्टाइन- नैसर्गिक सौंदर्य, आर्थिक संपन्नता, सामाजिक शिस्त आणि सुरक्षितता यांचे अद्वितीय मिश्रण असलेला लिक्टेंस्टाइन खरोखरच ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असल्याचा अनुभव देतो. युरोप ट्रिपचे नियोजन करत असाल, तर या छोट्याशा पण विलक्षण देशाला भेट नक्की द्या.