By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:21 IST
1 / 9PM Modi Oman Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 17-18 डिसेंबर रोजी ओमानच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा त्यांच्या तीन देशांच्या परराष्ट्र दौऱ्याचा अंतिम टप्पा असेल. 15 डिसेंबर रोजी जॉर्डनपासून त्यांनी या दौऱ्याची सुरुवात केली होती. भारत-ओमान राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 70 वर्षे पूर्ण होत असताना, हा दौरा होत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डिसेंबर 2023 मध्ये ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक अल सईद यांनी भारत दौरा केला होता. त्यावेळी सुलतान यांच्या विलासी जीवनशैलीची बरीच चर्चा रंगली होती.2 / 9ओमानचे सध्याचे सुलतान आणि पंतप्रधान हैथम बिन तारिक अल सईद यांनी 11 जानेवारी 2020 रोजी सत्ता हाती घेतली. ते माजी सुलतान काबूस बिन सईद यांचे चुलत बंधू असून, काबूस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्रानुसार, गादीवर आले आहेत. 11 ऑक्टोबर 1955 रोजी मस्कत येथे जन्मलेल्या सुलतान हैथम यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील पेम्ब्रोक कॉलेजमधून शिक्षण घेतले असून, 1979 मध्ये परराष्ट्र सेवा कार्यक्रम पूर्ण केला. 300 वर्षांहून अधिक काळ ओमानवर राज्य करणाऱ्या अल सईद घराण्याचे ते सदस्य आहेत. पाश्चिमात्य विचारसरणीचा प्रभाव असलेले सुलतान हैथम सार्वजनिक जीवनात तुलनेने कमी दिसतात, मात्र देशाच्या बळकटीकरणासाठी सक्रिय भूमिका बजावतात.3 / 9ओमानी शाही परंपरेनुसार सुलतान हैथम यांना एकच पत्नी आहे. त्यांची पत्नी अहाद बिन्त अब्दुल्ला या ओमानमध्ये महिला सशक्तीकरणाचे प्रतीक मानल्या जातात. सुलतान दाम्पत्याला चार अपत्ये, दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्यांचा मोठा मुलगा सैयद थेयाजिन बिन हैथम यांना 2021 मध्ये युवराज (क्राउन प्रिन्स) घोषित करण्यात आले. ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतलेले थेयाजिन संस्कृती, क्रीडा आणि युवक मंत्री म्हणून काम पाहतात. त्यांचा विवाह मेय्यान बिन्त शिहाब अल सईद यांच्याशी झाला आहे.4 / 9सुलतान हैथम यांच्या मालकीचे ओमानमध्ये सहा भव्य राजवाडे आहेत. यामध्ये सर्वात प्रसिद्ध अल आलम पॅलेस सुमारे 200 वर्षे जुना आहे. इतर शाही राजवाड्यांच्या तुलनेत साधा असला तरी, सोनेरी आणि निळ्या रंगांच्या भिंतींमुळे तो लक्षवेधी ठरतो. या राजवाड्याचे सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे.5 / 9फ्लॅग पॅलेसचा 1972 मध्ये शाही निवासस्थान म्हणून पुनर्बांधणी करण्यात आली. पांढऱ्या रंगाच्या या भव्य इमारतीत संगमरवरी आणि सोन्याची सजावट आहे. येथे अतिथींसाठी स्वतंत्र व्हिला, स्विमिंग पूल, स्पा आणि सुंदर बागा आहेत. हा संपूर्ण परिसर 16व्या शतकातील पोर्तुगीज किल्ले, 'मीरानी आणि जलाली' यांनी वेढलेला आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ, किंग चार्ल्स तसेच नेदरलँड्सच्या राणी यांसारखे अनेक मान्यवर येथे मुक्काम करून गेले आहेत.6 / 9सुलतान हैथम यांच्या परदेशातील मालमत्तांची एकूण किंमत सुमारे 100 दशलक्ष डॉलर असल्याचे सांगितले जाते. लंडन आणि दक्षिण इंग्लंडमधील अनेक आलिशान घरे यात समाविष्ट आहेत. स्टॅफर्डशायरमधील 14 एकरांवरील ‘हसेलौर हाउस’ या सात बेडरूमच्या बंगल्यात 1785 मधील चिमणी आणि कोलंबियन संगमरवरी डायनिंग रूम आहे. याशिवाय ‘वॉनहॅम मॅनर’ ही सुमारे 35 मिलियन डॉलर किमतीची मालमत्ता 1980 मध्ये खरेदी करण्यात आली होती. येथे 800 मीटर लांबीचा तलाव आणि हरणांसाठी फिरण्याचा परिसर आहे. माजी सुलतान काबूस येथे वर्षातून केवळ तीन दिवस राहत असत.7 / 9ओमानी शाही कुटुंबाकडे भव्य यॉट्सचा ताफा आहे. त्यातील सर्वात मोठी ‘अल सईद’ यॉट 155 मीटर (508 फूट) लांबीची असून, तिची किंमत सुमारे 600 मिलियन डॉलर्स आहे. या यॉटमध्ये 26 केबिन्स, अत्याधुनिक वैद्यकीय कक्ष, खासगी थिएटर, जकूझी आणि बैठक सभागृहे आहेत. अंतर्गत सजावट पारंपरिक ओमानी शैलीत करण्यात आली आहे. याशिवाय ‘अल सलामाह’ ही सपोर्ट यॉटही आहे. विमान प्रवासासाठी ओमान रॉयल फ्लाइटकडे सात सरकारी विमाने आहेत. यामध्ये तीन बोईंग 747 जंबो जेट, दोन एअरबस A320 आणि एक युरोकॉप्टर EC225 हेलिकॉप्टरचा समावेश आहे.8 / 9ओमानच्या शाही तबेल्यात 1,000 हून अधिक अरबी घोडे आहेत. 1974 मध्ये माजी सुलतान काबूस यांनी या तबेल्याची स्थापना केली होती. फ्रान्स आणि ब्रिटनमध्येही त्याच्या शाखा आहेत. सुलतान रोलेक्स घड्याळे भेट देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या घड्याळांवर ओमानचा शाही खंजर चिन्ह असते. 2012 मध्ये सुलतान काबूस यांनी राणी एलिझाबेथ यांना 25 किलो सोन्याचा राज्याभिषेक रथाचा प्रतिकात्मक मॉडेल भेट दिला होता.9 / 9प्रचंड संपत्ती असूनही, ओमानचे शाही कुटुंब इतर आखाती देशांच्या तुलनेत साधेपणा आणि संयमासाठी ओळखले जाते. सुलतान हैथम यांनी ‘ओमान व्हिजन 2040’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली असून, तिचा उद्देश तेलावरची अवलंबित्व कमी करणे आणि अर्थव्यवस्था अधिक मजबूत करणे हा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठीही त्यांनी नवीन कायदे लागू केले आहेत. परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधत सुलतान हैथम ओमानला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.