सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:18 IST
1 / 5Nepal Protest: भारताचा शेजारील देश नेपाळमध्ये सध्या हिंसक निदर्शने सुरू आहेत. सरकारचा भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया अॅप्सवरील बंदीविरोधात काठमांडूमध्ये हजारो Gen-Z तरुणांची निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनादरम्यान, शेकडो तरुण संसदेत घुसले अन् सर्वत्र तोडफोड केली. सध्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर कडक कर्फ्यू लावण्यात आला आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात Gen-Z तरुणांमुळे अनेक देशांमध्ये सत्तांतर झाल्याचे पाहायल मिळाले आहे. बांग्लादेश, थायलंड आणि श्रीलंका याची मोठी उदाहरणे आहेत.2 / 5सुदान - सुदानमध्ये ३० वर्षे सत्तेत असलेला हुकूमशहा ओमर अल-बशीरला २०१९ मध्ये तरुणाईच्या आंदोलनामुळे पद सोडावे लागले होते. २०१८ मध्ये Gen-Z तरुणांनी अन्न आणि इंधनासाठी निदर्शने सुरू केली. हळूहळू सामान्य नागरिकही त्यात सामील झाले. २०१९ च्या अखेरीस ओमर अल-बशीरला सुदान सोडावे लागले. Gen-Z तरुणांनी बशीरला हटवण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला. तरुणांनी सुदानीज प्रोफेशनल अॅक्टिव्हिझम नावाची संघटनाही स्थापन केली होती. 3 / 5श्रीलंका- भारताच्या शेजारी असलेल्या श्रीलंकेत २०२२ मध्ये तरुणांनी राजपक्षे यांची सत्ता उलथून लावण्यात मोठी भूमिका बजावली होती. आर्थिक संकट आणि महागाईमुळे श्रीलंकेतील लोक रस्त्यावर उतरले. सरकारने या निषेधाला हलक्यात घेतले अन् लाठीचार्ज केला. त्यानंतर निदर्शकांनी राजधानी कोलंबोमध्ये गोटा गो होम नावाचे आंदोलन सुरू केले. चळवळीची आग पेटली अन् जुलै २०२२ मध्ये गोटाबाया राजपक्षे त्यांच्या कुटुंबासह पळून गेले. त्यानंतर, गोटाबाया यांच्या जवळच्या सहकाऱ्याला श्रीलंकेचे अध्यक्षपद मिळाले. परंतु २०२४ च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर आला.4 / 5थायलंड- २०१४ मध्ये प्रयुत चान यांच्या नेतृत्वाखाली थायलंडचे सरकार स्थापन झाले. चान यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप होता. २०२० मध्ये कोरोना काळात जनता चानच्या सरकारविरुद्ध एकवटली, परंतु निषेधाला फारशी गती मिळाली नाही. त्यानंतर, Gen-Z तरुणांनी चळवळ स्वतःच्या हातात घेतली. या तरुणांच्या २ मुख्य मागण्या होत्या. १. पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा यांचा राजीनामा. २. लष्करावरील राजकीय नियंत्रण कमी करण्यासाठी नवीन संविधानाचा मसुदा तयार करणे. निदर्शने पाहता २०२१ मध्ये चान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर थायलंडमध्ये निवडणुका झाल्या.5 / 5बांग्लादेश- बांग्लादेशातील शेख हसीना सरकारविरुद्ध जुलै २०२४ मध्ये तरुणाई रस्त्यावर उतरली. यांची मुख्य मागणी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची होती. शेख हसीना यांचे सरकार ते योग्यरित्या हाताळू शकले नाही. परिणामी पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केला आणि गोळ्या झाडल्या. अखेर ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना बांग्लादेशातून पळून भारतात आश्रय घ्यावा लागला. तेव्हापासून तिथे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे.