1 / 6Iran Protest, Hadees Najafi: इराणमध्ये महसा अमिनीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यापासून देशभरात हिजाब विरोधात निदर्शने सुरू आहेत. हिजाबच्या विरोधात महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. निषेध म्हणून या महिला आपले लांबसडक केस कापून सरकारला आव्हान देत आहेत. अशाच एका निदर्शनात सहभागी झालेल्या २० वर्षीय तरुणीला इराणी सुरक्षा दलांच्या सैनिकांनी गोळ्या घातल्याची घटना घडली आहे. (Mahsa Amini Death)2 / 6सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. हदीस नजाफी असे या तरुणीचे नाव असून, ती इराणमधील टिकटॉक आणि इंस्टाग्रामचा लोकप्रिय चेहरा होती. हदीस नजाफीचा हिजाबविरोधी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती निषेध आंदोलनात सामील होण्यापूर्वी तिचे केस बांधून सज्ज होत असल्याचे दिसले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हदीस हिला 'पोनीटेल गर्ल' म्हणून ओळखले जाऊ लागले होते.3 / 6मिळालेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री काराज शहरात इराणी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात नजाफी मारली गेली. सुरक्षा दलांनी तिच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि छातीवर मिळून एकूण सहा गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण सहा गोळ्या लागल्याने ती फार काळ मृत्यूशी झुंज देऊ शकली नाही. रुग्णालयातच तिला मृत घोषित करण्यात आले.4 / 6नजाफीच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडियावर तिना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. एका व्यक्तीने ट्विट करून म्हटले आहे की, इराण सरकारने आणखी एक बळी घेतला. हदीस नजाफी हिच्या मृत्यूला इराण सरकारच जबाबदार आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने ट्विट केले की, हदीस नजाफी केवळ २० वर्षांची होती, पण धाडसी आणि शूर मुलगी होती. काराज शहरात सुरक्षा दलांनी तिच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या कारवाईचा आम्ही निषेध करतो.5 / 6२२ वर्षीय महसा अमिनी (Mahsa Amini) हिला तेहरानच्या पोलिसांनी हिजाब नीट न घातल्यामुळे ताब्यात घेतले होते. तिचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने शिगेला पोहोचली आहेत. हजारो महिला रस्त्यावर उतरून हिजाबला विरोध करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या निदर्शनांमध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे.6 / 6सरकारच्या नियमांबद्दल महिला आणि नागरी हक्क संघटनांमध्ये संताप आहे. त्यामुळे इराणमध्ये इंटरनेटवरही बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या सरकारने कठोर कारवाईचा इशारा देऊनही लोकांचा विरोध शांत होत नाही. न्यायपालिका प्रमुख मोहसेनी यांनी रविवारी सांगितले की, दंगल भडकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. असे असूनही आंदोलन सुरु असून त्यात हदीससारख्या तरुणीचा जीव जात असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.