शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गँगवॉरची भूमी ते फुटबॉलची पंढरी; धारावीपेक्षा दुप्पट असलेल्या धुरंधरच्या 'लयारी'ची थरारक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 00:25 IST

1 / 9
मुंबईतील धारावीपेक्षा जवळपास दुप्पट असलेल्या या छोट्याशा वस्तीचा उदय एक सामान्य वसाहत म्हणून झाला, मात्र १९८० च्या दशकात ती टोळ्या आणि संघर्षाचे केंद्र बनली. आज ही वस्ती फुटबॉल, बॉक्सिंग, थिएटर आणि रॅप संगीत कलेसाठी ओळखली जात आहे.
2 / 9
लयारी हे कराचीतील सर्वात जुने उपनगर असून ते शहराच्या जन्मापूर्वीपासून अस्तित्वात आहे. १८ व्या शतकात हे एक छोटे मासेमारी गाव होते, जेथे मकरानी-बलूच लोकांची वस्ती होती.
3 / 9
१८३० मध्ये ब्रिटिशांनी बंदर आधुनिकीकरण केल्यानंतर, लयारी कामगारांचे केंद्र बनले. बलुच लोकांव्यतिरिक्त पंजाबी, कच्छी, सिंधी, सिद्दी आणि पश्तून (पठाण) यांसारखे विविध समुदाय येथे येऊन स्थायिक झाले.
4 / 9
ब्रिटिश काळात लयारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे प्रामुख्याने मुस्लिम कामगारांचे क्षेत्र असल्याने हिंदू व्यापारी समुदायाने येथे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली नाही. त्यामुळे वस्ती अत्यंत अव्यवस्थित आणि गलिच्छ झाली. १९४७ च्या फाळणीनंतर, मोठ्या संख्येने उर्दू बोलणारे निर्वासित येथे आले आणि वस्तीचा ताण वाढला.
5 / 9
फाळणीनंतर लयारीची परिस्थिती आणखी बिघडली. १९६० च्या दशकात येथे 'काला नाग' आणि 'दलाल' यांसारख्या लहान टोळ्या सक्रिय झाल्या, ज्यांनी अंमली पदार्थांचा व्यापार आणला.
6 / 9
१९७९ मध्ये सोव्हिएतने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर, उत्तरेकडील अधिक पश्तून आणि कुशल बंदूकधारी येथे आले. त्यामुळे कराचीमध्ये अंमली पदार्थांचा व्यापार आणि त्यातून येणारा हिंसाचार लयारीमध्ये रुजला.
7 / 9
लयारी १९७० च्या दशकापासून 'पीपल्स पार्टी'चा मजबूत गड राहिला आहे. स्थानिक राजकारणात गँग्सचा हस्तक्षेप वाढला. १९८० आणि १९९० च्या दशकात रहमान डकैत आणि उजैर बलुच यांच्या टोळ्यांना पीपीपीचा तर अर्शद पप्पू याला एमक्यूएमचा पाठिंबा मिळाला.
8 / 9
२०१० पर्यंत येथील लोकसंख्या प्रचंड वाढली होती, ज्यामुळे गरीबी आणि मूलभूत सुविधांचा अभाव अधिक तीव्र झाला. २०१३ पर्यंत कराची शहरात गँगवॉरमध्ये ३,२०० हून अधिक लोक मारले गेले होते. २०१२ नंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे पीपीपीला रहमान डकैतच्या 'पीपल्स अमन कमिटी' पासून पाठिंबा काढून घ्यावा लागला. २०१३ पर्यंत पाकिस्तान रेंजर्स आणि पोलिसांनी १००० हून अधिक गुन्हेगारांना अटक करून परिसरात शांतता प्रस्थापित केली.
9 / 9
हिंसाचाराचा इतिहास असला तरी लयारीने अनेक प्रसिद्ध व्यक्तींना जन्म दिला. ऑलिम्पिक बॉक्सर हुसैन शाह, फुटबॉलपटू उमर बलुच आणि गुलाम अब्बास, पाकिस्तानचे माजी मुख्य न्यायाधीश सय्यद सज्जाद अली शाह आणि शिक्षणतज्ज्ञ वाजा गुलाम मुहम्मद नूर-उद-दीन. यांचा यामध्ये समावेश आहे
टॅग्स :Pakistanपाकिस्तान