बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:41 IST
1 / 8१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळत असताना फळणीच्या घावांनी भारताचे दोन तुकडे झाले होते. त्यातून पाकिस्तान हा नवा देश अस्तित्वात आला होता. या पाकिस्तानचे पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान असे दोन भाग होते. मात्र भाषिक आणि राजकीय वादाची परिणती भीषण संघर्षात होऊन अवघ्या २४ वर्षांत पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांगलादेश अस्तित्वात आला. मात्र आता बांगलादेशमधील अंतर्गत परिस्थितीचा गैरफायदा उठवत हा भाग पुन्हा एकदा १९७१ पूर्वीचा पूर्व पाकिस्तान करण्याचा भयानक डाव पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी आखला आहे. 2 / 8असीम मुनीर यांच्या या कटकारस्थानाबाबत बांगलादेशमधील प्रसिद्ध पत्रकार सलाहुद्दीन शोएब चौधरी यांनी धक्कादायक दावा केला आहे. तसेच या कटकारस्थानाला वेळीच लगाम लावला नाही तर ते संपूर्ण दक्षिण आशियात अस्थिरतेचं कारण ठरेल, असा दावाही त्यांनी केला आहे. 3 / 8एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखामध्ये सलाहुद्दीन शोएब चौधरी यांनी दावा केला की, गतवर्षी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. देशातील अस्थिरतेचा फायदा घेऊन बांगलादेशमध्ये प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करण्याचा आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी एक अड्डा म्हणून या भागाला परिवर्तित करण्याचा त्यांचा डाव आहे. 4 / 8पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्याचा दावा केला जात आहे. तसेच मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना एक मोठी ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा भागामध्ये तेलाच्या साठ्यांच्या शोधाच्या बदल्यात मुनीर यांनी पाकिस्तानला दक्षिण आशियामध्ये एक विश्वासू सहकारी म्हणून बांगलादेश सोपवण्यात यावा आणि तो पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली राहावा, अशी मागणी मुनीर यांनी ट्रम्प यांच्याकडे केल्याचे सांगितले जात आहे. 5 / 8बांगलादेशवर नियंत्रण प्रस्थापित करून अमेरिकेला भारतावर सातत्याने दबाव कायम ठेवण्यात मदत करू, असं आश्वासन असीम मुनीर देत आहेत. तसेच यामाध्यमातून अमेरिका इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत असलेल्या प्रभावालाही आळा घालू शकतो, असा दावाही मुनीर यांनी केला आहे. त्यामुळेच बांगलादेशमध्ये आणखी एका परिवर्तनासाठी मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्पकडे पाठिंबा मागितला आहे. तसेच बांगलादेशमधील लष्करप्रमुखपदी जनरल वकार ऊल जमा यांच्याऐवजी एखादा पाकिस्तान समर्थक अधिकारी असावा, अशी इच्छाही मुनीर यांनी व्यक्त केली आहे. 6 / 8याशिवाय असीम मुनीर यांनी कथितपणे अमेरिकन डीप स्टेटच्या प्रमुख लोकांशी आणि सीआयएच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यांनी बांगलादेशला युरोप, उत्तर अमेरिका आणि आशियासाठी अफगाणी अमली पदार्थांच्या वाहतुकीचे केंद्र म्हणून बदलण्यासाठी पाकिस्तानकडून सहकार्याचा प्रस्ताव दिला. तसेच या माध्यमातून अब्जावधी डॉलरचा व्यापार होईल, गुप्त मोहिमांत वाढ होईल आणि आयएसआय भक्कम होईल, असा दावा केला. 7 / 8याबरोबरच असीम मुनीर यांनी रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशमध्ये असलेल्या बिहारी मुस्लिमांवर आयएसआयच्या असलेल्या प्रभावाचा फायदा घेऊन एक लढाऊ सैन्य तयार करण्याचा इरादाही जाहीर केला. हे सैन्य म्यानमार आणि ईशान्य भारताला अस्थिर करण्याचं काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 8 / 8दरम्यान, बांगलादेशमध्ये असीम मुनीर करत असलेली कटकारस्थानं यशस्वी झाल्यास त्यामुळे भारतासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानचा हा कट यशस्वी झाल्यास पाकिस्तान बांगलादेशला दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी आणि भारतविरोधी कारवायांचा अड्डा बनवेल. तसेच या भागात आपला प्रभाव निर्माण करून पाकिस्तान भारतातील मोठ्या भूभागाला अस्थिर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.