या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:28 IST
1 / 7तुर्की देशाच्या मध्य भागात असलेल्या कोन्या प्लेन येथे स्थानिक रहिवाशांसमोर एक मोठं संकट उभं ठाकलं आहे. येथे सुमारे ७०० मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या खड्ड्यांना इथे ओब्रुक असेही म्हटले जाते. हे महाकाय खड्डे शेतजमिनीसह आजूबाजूचा परिसर गिळंकृत करत आहेत. आता त्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. 2 / 7दीर्घकाळापासून पडलेला दुष्काळ आणि भूगर्भातील पाण्याचा बेसुमार वापर हे हे खड्डे पडण्यामागचं मुख्य कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. डिसेंबर २०२५ मधील ताज्या रिपोर्टनुसार अशा खड्ड्यांची संख्या ६८४ एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तुर्कीचं अन्नधान्य उत्पादनाचं केंद्र समजला जाणारा हा परिसर संकटात सापडला आहे. हे ओब्रुक जमिनीखालील खडकांमध्ये पाणी मिसळल्याने तयार होतात. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा वरची माती खाली खचते आणि असे खड्डे तयार होतात. 3 / 7कोन्या येथील हा भाग कार्स्ट क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. येथे चुनखडकांचे प्रमाण लक्षणीय आहे. हे खडक पाण्यामध्ये सहजपणे विरघळतात. २००० सालच्या दशकामध्ये हे खड्डे वेगाने तयार होऊ लागले. यातील काही खड्डे तर २०० फुटांहून अधिक खोल आहेत. ऑगस्ट २०२५ मध्ये करमान प्रांतातील सुदुरागी गावामध्ये १५ मीटल लांब आणि ५ मीटर खोल असा ओब्रुक तयार झाला होता. तर सप्टेंबर महिन्यात करापिनार येथे ४० मीटर खोल इनोबा ओब्रुक दिसून आला. 4 / 7गेल्या काही काळापासून तुर्की हवामानातील बदलाचा सामना करत आहे. येथे पावसाचे प्रमाण कमी होत चाललं आहे. तर तापमान वाढत आहेत. कोन्या येथे असलेले पाण्याचे तलाव आणि जलाशये आटत चालली आहेत. शेतकरी धान्य, बीट आणि मका यासारखी पिके घेण्यासाठी भूजलावर अवलंबून आहेत. एवढंच नाही तर पाण्याचा उपसा करण्यासाठी येथे हजारो अवैध विहिरी खोदल्या गेल्या आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी वेगाने खाली गेली आहे. 5 / 7नासाने दिलेल्या माहितीनुसार २०२१ मध्ये येथील जलाशय १५ वर्षांमधील सर्वात तळाच्या पातळीपर्यंत पोहोचले होते. आता बेकायदेशीर विहिरींचं खोदकाम थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र दुष्काळ एवढा तीव्र आहे की शेतकऱ्यांना विहिरी खोदणे भाग पडत आहे. कोन्या हा तुर्कीमधील सर्वात मोठा धान्य उत्पादक प्रदेश आहे. ३६ टक्के गहू आणि ३५ टक्के बीटचं उत्पादन याच परिसरात होते. मात्र आता येथील शेतांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. 6 / 7काही शेतकऱ्यांनी धोकादायक परिसर सोडला आहे. येथे शेतीचं काम करण्यासही शेतकऱ्यांना भीती वाटते. अनेकांच्या शेतांमध्ये दोन दोन ओब्रुक तयार झाले आहेत. एवढंच नाही तर गावांमध्येही ओब्रुक तयार होत असल्याने घरांनाही धोका निर्माण झाला आहे. 7 / 7तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोन्या, करमान आणि अक्सराय येथील एकूण ६८४ ओब्रुकची नोंदणी केली आहे. बेकायदेशीर विहिरींच्या खोदकामावर नियंत्रण आणण्यात आलं आहे. मात्र हवामानातील बदल आणि पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाशिवाय ही समस्या थांबणार नाही, असे तज्ज्ञांनीं सांगितले. तसेच अधिक पाऊस पडला नाही तर आणखी ओब्रुक तयार होतील, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.