आई होण्याचा अनुभव किती सुंदर असतो, विलक्षण असतो, दैवी असतो, अशी वाक्यं आपण येताजाता ऐकतो, वाचतो, म्हणतो. पण खरंच तसं असतं का? नव्यानं आई झालेल्या कुणाही तरुणीस विचारा मूल जन्माला आल्यानंतरचे पहिले काही दिवस तिच्यासाठी अत्यंत कठीण परीक्षेचे असतात. मानसिक शारीरिक क्षमतेचा कस पाहतात. त्याच काळात घरातल्या आयाबाया अनेक सूचना तिला करतात, सल्ले देतात आणि अमूकच कर असा आग्रह धरतात. मात्र आपल्याला जे होतंय किंवा जे वाटतं आहे, जो त्रास होतो आहे तो नेमका का होतो आहे असा प्रश्न तिनं विचारला तर उत्तर एकच येतं, 'होतंच असं, त्यात विशेष काही नाही, आई झालीस ना मग सहन करावंच लागेल!' मात्र या फुकट उपदेशांमुळे प्रश्न सुटतच नाही. कारण आई होण्यापूर्वी काही गोष्टी अनेकींना माहितीच नसतात, कुणी सांगतच नाहीत आणि जमेल ते आपोआप म्हणून गृहित धरल्या जातात. साधारण 5 गोष्टी अशा असतात की नव्यानं आई होणाऱ्या बाईशी, पहिलटकरणीशी कुणी त्यासंदर्भात बोलतच नाहीत. माहितीच नसतात अनेकींना या 5 गोष्टी. आणि त्यामुळे बाळंतपणानंतरचे सुरुवातीचे दिवस अत्यंत अवघड जातात. परीक्षा पाहतात. मनस्ताप देतात. ते सारं टाळायचं तर तुमचं बाळ जन्माला येण्यापूर्वीच या 5 गोष्टींसदर्भात माहिती करुन घेतलेली बरी! त्यासाठीची मानसिक तयारी, आवश्यक असल्यास काही बॅकप प्लॅन, याचीही तजबीज करुन ठेवता येवू शकते. प्रश्न फक्त एवढाच आहे की त्या 5 गोष्टींसदर्भात आपण बोलणार की नाही? बोला, माहिती करुन घ्या आणि बाळाच्या स्वागताला या 5 गोष्टींसंदर्भात केलेल्या तयारीनीशी सज्ज व्हा. तरच तुमचं आईपण अधिक सजग आणि आनंदी होवू शकेल. आई होणं उदात्त असलं तरी आई झाल्यावर आनंदी राहणं ही सतत सरावानं येणारी गोष्टी आहे. १) स्तनपान- ते काय जमतंच? -अजिबात नाही!! अनेकींना असं वाटतं की आपल्याला मूल झालं की पान्हा फुटतोच आणि सहज स्तनपान जमतं. आईआजी म्हणतात येईल तुला आपोआप तेव्हा स्तनपान करता! मात्र तसं नसतं. अजिबात नसतं. एक पूर्णत: स्वतंत्र जीव चोवीस तास आपल्या शरीराला चिकटून आपल्या शरीरावर पोसला जातो आहे. दूध पितो आहे, त्यानं येणारा थकवा तर कमालीचा असतोच. मात्र त्याहीपेक्षा स्तनपान हे एक तंत्र आहे. एक छोटा जीव आपल्या देहाशी त्या तंत्रानं जोडून घ्यावा लागतो. बाळाचा आ होणं, त्यानं योग्यप्रकारे दूध पिणं, आईनं त्याच्या मानेला आधार देवून त्याला योग्यप्रकारे घेणं हे सारं एक तंत्र आहे. ते सहजी जमत नाही. सुरुवातीच्या काळात बाळ रडतं, उपाशी राहू शकतं, आपल्याला बाळाला घेताच येत नाही म्हणून ते रडतं या भावनेनं अपराधी वाटतं, बेचैन होतं. जे साऱ्यांना सहज येतं ते आपल्याला येत कसं नाही असं वाटून संताप होतो. पण ते बाजूला ठेवा कारण अनेकींना ते येत नाही. फक्त बायका मला स्तनपान सुरुवातीला जमत नव्हतं असं एकमेकींना सांगत नाहीत. उलट मला कसं सहज जमलं असं खोटं बोलतात. ते बाजूला ठेवा आणि इंटरनेटवर ब्रेस्टफिडिंगसंदर्भात असलेले व्हिडीओ पहा, शिकून घ्या. आणि तरी नाही जमलं तर जमेल हळूहळू असा विश्वास ठेवा, पॅनिक होवू नका. २) पाठदुखी-कंबरदुखी-डोकेदुखी- मूळव्याध? -छळणारच! बाळंतपणानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत हा त्रास होतो. त्या त्रासावर औषधोपचार, व्यायाम आवश्यक असतात. त्यात झोप कमी झालेली असते, स्तनपानानं थकवा येतो. पित्त होतं अनेकींना याकाळात. मुळव्याधीचा भयंकर त्रास होवू शकतो. त्यातून हे आजार होतात. त्यामुळे आपल्यासंदर्भात असं होवू शकतं याची मानसिक तयारी हवी. ३) रात्रीची झोप? -विसरा! रात्रीची झोप हा प्रकारच काही दिवस विसरावा लागतो. बाळ रडतं, खेळतं, दूध पितं, त्याचं पोट दुखतं, गॅसेस होतात. त्यातून त्याचं बॉडी क्लॉक सेट होईपर्यंत जागरणं होतातच. त्यासाठीची मानसिक तयारी करुन ठेवा. त्यामुळे रात्रीची जागरणं अटळ होतात. ४) बाळानंतर डिप्रेशन कसं येतं?- येतंच!! अनेकींना बाळंतपणानंतर डिप्रेशन येतं. त्याला पोस्ट पार्टेम डिप्रेशन म्हणतात. काहीजणींचं ते पटकन जातं. काहीजणींना खूप काळ त्रास होतो. उदास वाटतं, रडू येतं, नैराश्य येतं, बाळ आवडत नाही. खूप फटीग येतो. त्यामुळे बाळ झालं छान तरी आपल्याला कसं असं वाटतं, आपण चांगली आई नाही का असे विचार करू नका. बाळंतपणानंतरचं डिप्रेशन कॉमन आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका. गरज पडल्यास मानसोपचाराची मदत घ्या. ती घेतली तर यातून बाहेर पडून आपलं आईपण जास्त एन्जॉय करता येवू शकेल. मात्र यासंदर्भात गप्प बसू नका, घरच्याघरी उपाय करू नका. इतरांनी दोष दिला तर त्याकडे दुर्लक्ष करा कारण याविषयासंदर्भात आपल्याकडे भयंकर अज्ञान आहे. ५) बाळ कधी आवडतं, कधी नाही? - होतं असं! आपण ज्याची आतुरतेनं वाट पाहिली ते बाळ कधी आवडतं, कधी नाही. कधी बाळाचा राग येतो. आपल्या स्वातंत्र्यावर गदा आली, आपण फार अडकून पडलो असं मनात येतं. हे सारं नॉर्मल आहे. तसं वाटू शकतं. त्यात पोस्टपार्टेम डिप्रेशन असेल तर जास्तच वाटतं. त्यामुळे त्याचा फार विचार न करता थोडा वेळ जावू द्यावा. बाळ आपलंच असलं तरी ते एक वेगळा स्वतंत्र जीव आहे, त्याची आपल्या जगण्यात सवय होईपर्यंत वेळ जाईल असं स्वत:ला सांगणं महत्वाचं. बाळावर जीवापाड प्रेम असतंच, सवय होणं ही वेगळी गोष्ट असते.