शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटची दोन नवी लक्षणं आली समोर, वैज्ञानिकांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 13:31 IST

1 / 8
डोकेदुखी, घशात खवखव आणि सर्दी ही ब्रिटनमध्ये कोरोनाची खूप सामान्य लक्षणं झाली आहेत. पण Zoe Covid Symptom चा अभ्यास करणाऱ्या प्राध्यापक टिम स्पेक्टर यांच्या माहितीनुसार डेल्टा व्हेरिअंटची तरुणांमध्ये गंभीर स्वरुपाची सर्दी हे लक्षण दिसून येऊ लागलं आहे. या सर्दीनं ताप येत नसला तरी व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली असू शकते आणि त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो.
2 / 8
गंभीर स्वरुपाची सर्दी जरी झालेली असेल तरी कोरोनाची चाचणी करायला हवी असं अभ्यासकांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (NHS)माहितीनुसार लोकांमध्ये खोकला, ताप आणि चव जाणं ही लक्षणं जरी आढळली तरी त्याकडे दुर्लक्ष करु नये असं नमूद करण्यात आलं आहे.
3 / 8
सर्दी, खोकला, चव जाणं, घसा खवखवणं ही लक्षणं खूप सामान्य लक्षणं झाली आहे. पण लोक आता कोविड संदर्भातील अॅपवर नव्या लक्षणांची नोंद करू लागले आहेत. त्यानुसार आम्ही लोकांनी सांगितलेल्या लक्षणांचा अभ्यास केला आणि आता सुरुवातीसारखं काहीच राहिलेलं नाही. लक्षणांमध्ये खूप बदल झाला आहे असं दिसून आल्याचं प्राध्यापक स्पेक्टर यांनी सांगितलं.
4 / 8
लक्षणांमध्ये आलेला बदल हा कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिअंट संदर्भातील असू शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार डेल्टा व्हेरिअंट सर्वात आधी भारतात आढळून आला असून ब्रिटनमध्ये या व्हिरिअंटचे ९० टक्के रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांमध्ये सुरुवातीला ताप येणं हे आधीसारखंच सामान्य लक्षणं आहे. पण वास न येण्याच्या लक्षणात बदल झाला आहे.
5 / 8
डेल्टा व्हेरिअंटमुळे होणारं इन्फेक्शन थोडं वेगळ्या पद्धतीनं काम करत असल्याचं प्राध्यापक स्पेक्टर म्हणाले. लोकांना सुरुवातीला वाटतं की सामान्य स्वरुपाचा ताप आला आहे आणि त्याबाबत निष्काळजीपणा बाळगल्यानं इन्फेक्शन बळावतं. यामुळे एका व्यक्तीतून किमान सहा जणांमध्ये या व्हेरिअंटचं सहजपणे संक्रमण होतं. त्यामुळे हा एक मोठा धोका आपल्यासमोर निर्माण होतोय, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.
6 / 8
सामान्य स्वरुपाचा ताप येणं आणि सुस्ती येणं हे डेल्टा व्हेरिअंटचं नवं लक्षण आहे. त्यामुळे सामान्य स्वरुपाचा ताप देखील अंगावर न काढण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ताप नसला आणि गंभीर स्वरुपाची सर्दी जरी झालेली असेल तरी कोरोना चाचणी करायला हवी, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. तसंच अशा व्यक्तींनी जबाबदारी ओळखून जास्त लोकांच्या संपर्कात येणं टाळावं, असंही त्यांनी म्हटलं.
7 / 8
लंडनच्या इम्पॅरिअल कॉलेजनं १० लाखांहून अधिक लोकांचा अभ्यास केल्यानंतर जेव्हा अल्फा आणि युके व्हेरिअंटमध्ये सामान्य स्वरुपाची लक्षणं समोर आली होती. यात थंडीताप, भूक न लागणं, डोकेदुखी आणि मांसपेशी दुखणं यासारख्या लक्षणांचा समावेश होता. डेल्टा व्हेरिअंटमध्येही मांसपेशी दुखणं हे लक्षण दिसून येत आहे.
8 / 8
सरकारी आदेशानुसार विचार करायचा झाल्यास सातत्यानं होणारी सर्दी, ताप येणं आणि चव जाणं, वास ओळखता न येणं ही कोरोनाची सर्वात मोठी लक्षणं आहेत. यासोबत इतरही काही लक्षणं जोडली जाऊ शकतात. दरम्यान, आतापर्यंत समोर आलेली लक्षणं कोविडमुळेच असतात असंही नाही. त्याची इतरही काही कारणं असू शकतात. त्यामुळे तुम्हाला अशी काही लक्षणं आढळत असतील तर आधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस