कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 14:47 IST
1 / 7उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'Birch by Romeo Lane' या नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर क्लबच्या अवैध बांधकामावर आणि सुरक्षा नियमांच्या उल्लंघनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या बेकायदा नाईट क्लबच्या मालकाचे नाव सौरभ लूथरा असल्याचे समोर आले आहे. 2 / 7अर्पोरा ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन रेडकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'Birch by Romeo Lane' हा नाईट क्लब सौरभ लूथरा नावाचा व्यक्ती चालवत होता. लूथरा याच्या लिंक्डइन, इन्स्टा अकाऊंटवर तसेच Romeo Lane या रेस्टॉरंटच्या चेनच्या वेबसाईटवरही त्यांचा उल्लेख आहे. 3 / 7यानुसार रोमिओ लेनचे भारतातच नाही तर परदेशातही क्लबची चेन आहे. ब्रँड रोमियो लेन सध्या २२ शहरे आणि ४ देशांमध्ये कार्यरत आहे. सौरभ लुथरा याला टाइम्स हॉस्पिटॅलिटी आयकॉन २०२३ द्वारे आयकॉनिक रेस्टॉरंट मालक म्हणून सन्मानित करण्यात आले होते. ते इंजिनिअर आहेत. 4 / 7गौरव (३९) आणि सौरभ (३५) या दोन्ही भावांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. गौरवने १५ वर्षे, तर सौरभने १० वर्षे टीसीएस (TCS) आणि जेके ग्रुप (JK Group) सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. २०१६ मध्ये त्यांनी कॉर्पोरेट करिअर सोडून F&B उद्योगात प्रवेश केला. 5 / 7सुरुवातीला गौरव याने त्यास विरोध केला होता. परंतू, दोघांनी मिळून 'Mama's Buoi' नावाची पहिली व्हेंचर स्थापन केली. आता त्यांच्याकडे Mama's Buoi, Dramebaaz आणि Romeo Lane हे ब्रँड चालवत आहेत. 6 / 7सरपंच रोशन रेडकर यांनी या क्लबच्या कायदेशीर वैधतेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरपंचांनी सांगितले की, ज्या जागेवर हा क्लब उभा होता, त्या बांधकामाला कोणताही वैध बांधकाम परवाना नव्हता. क्लबचे हे बांधकाम पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या 'सॉल्टपॅन' जागेवर, तसेच सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून उभारले होते.7 / 7वैध परवाना नसल्यामुळे ग्रामपंचायतीने नियमानुसार क्लबला पाडण्याची नोटीस जारी केली होती. पाडण्याच्या या नोटीसविरुद्ध अपील करण्यात आले आणि न्यायालयाने त्यावर स्थगिती दिली होती, ज्यामुळे क्लब सुरुच होता.