EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 10:59 IST
1 / 8महागडी लाईफस्टाईल जगण्यासाठी ही मंडळी मोठ्या प्रमाणावर कर्ज आणि EMI वर अवलंबून आहेत. याउलट, देशातील श्रीमंत लोक कोणताही दिखावा न करता आपली संपत्ती आणि गुंतवणूक वाढवण्यावर भर देत आहेत. हा वाढता ट्रेंड देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, अशी चिंता चार्टर्ड अकाउंटंट नितीन कौशिक यांनी अलीकडील एका पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.2 / 8सीए नितीन कौशिक यांच्या मते, आज मध्यमवर्ग गरजा पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर इतरांना प्रभावित करण्यासाठी कर्ज घेत आहे आणि हीच सर्वात मोठी चूक आहे. पर्सनल लोन, कार लोन किंवा क्रेडिट कार्डचे थकबाकी आज प्रत्येक दुसरा भारतीय कोणत्या ना कोणत्या कर्जात अडकला आहे.3 / 8कौशिक यांच्या माहितीनुसार, भारतात सुमारे ७०% आयफोन आणि ८०% कार EMI वर खरेदी केल्या जातात. याचा अर्थ मध्यमवर्ग कर्जाच्या जोरावर स्टायलिश जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या मते, कर्ज आता गरज न राहता 'सवय' बनले आहे.4 / 8'बिझनेस टुडे'च्या अहवालानुसार, मे २०२५ पर्यंत भारतीयांनी गेल्या दोन वर्षांत ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पर्सनल लोन घेतले आहे आणि यात युवा नोकरदार वर्गाचा सर्वाधिक सहभाग आहे. यासोबतच, देशातील डीमॅट खात्यांची संख्याही १९ कोटींच्या पुढे गेली आहे.5 / 8या आकडेवारीवरून एक गंभीर बाब समोर येत आहे की, आता लोक कर्ज घेऊन शेअर बाजारातही पैसे लावत आहेत, जे तज्ज्ञांच्या मते अत्यंत धोकादायक पाऊल आहे.6 / 8कौशिक यांनी एका उदाहरणाचा उल्लेख केला, ज्यात एका व्यक्तीने पर्सनल लोन घेऊन स्मॉल-कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करून ४०% नफा कमावला होता. मात्र, अशा ट्रेंडमुळे दीर्घकाळात मोठे आर्थिक संकट येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. कारण प्रत्येक गुंतवणूकदार नशीबवान नसतो.7 / 8सीए कौशिक यांनी श्रीमंत आणि मध्यमवर्गाच्या विचारसरणीतील स्पष्ट फरक सांगितला आहे. श्रीमंत लोक कर्ज वापरून मालमत्ता निर्माण करतात, ज्यामुळे त्यांची संपत्ती वाढते. तर दुसरीकडे मध्यमवर्ग कर्ज घेऊन जबाबदाऱ्या खरेदी करतो, जसे की महागडा फोन, कार किंवा जीवनशैलीवरील खर्च.8 / 8कौशिक यांच्या मते, शिक्षण, घर किंवा व्यवसायातील गुंतवणूक यासाठी घेतलेले कर्ज 'चांगले कर्ज' असते. याउलट, फोन, कार किंवा लाइफस्टाइलवर घेतलेले कर्ज 'आर्थिक दुर्बलतेचे' लक्षण आहे. जर हा ट्रेंड असाच वाढला, तर येत्या काही वर्षांत भारतीय मध्यमवर्गावरील कर्जाचा बोजा मोठा आर्थिक पेचप्रसंग निर्माण करू शकतो, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.